अपंग असल्याचे कारण देत मंजूर गृहकर्ज नाकारणाऱ्या आयसीआयसीआय बँकेने ‘लोकसत्ता’ सहदैनिकातील वृत्तानंतर सपशेल माघार घेतली असून, बँकेने त्वरित कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. कर्ज प्रक्रियेसाठी बँकेचा कर्मचारी साळवे यांच्या घरी पाठविण्यात येणार आहे.

विरारमध्ये राहणाऱ्या संतोष साळवे या अपंग तरुणाला विरारमधील बोळिंज येथील म्हाडा प्रकल्पातील सोडतीत सदनिका लागली होती. त्याला आयसीआयसीआय बँकेने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गृहकर्ज मंजूर केले होते. मात्र तो अपंग असल्याचे लक्षात येताच कर्ज नामंजूर केले होते. अपंग तरुणास कर्ज नाकारल्याबद्दल बँकेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ  लागला होता. बँकेला आपली चूक उमजली आणि त्यांनी कर्ज देण्याचा निर्णय घेतला.

आयसीआयसीआय बँकेने साळवे यांची माफी मागितली आहे. साळवे यांना कर्ज मंजूर केल्याचे कळवत पुढील प्रक्रियेसाठी बँकेचा कर्मचारी थेट घरी पाठविणार असल्याचे कळवले आहे. बँक केवळ एवढय़ावरच थांबली नसून साळवे यांना पूर्वी ६० टक्के मंजूर केलेले कर्ज थेट ९० टक्क्य़ांपर्यंत वाढवले आहे. या प्रकरणात चूक झाली, आता आणखी प्रकरण वाढवू नका, अशी विनंतीही बँकेने केल्याची माहिती अर्जदार साळवे यांनी दिली. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बँकेने माझी माफी मागून अधिक रकमेचे कर्ज मंजूर केले आहे. सर्व अपंगांना न्याय मिळायला हवा, असे साळवे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.