चिपी येथील नियोजित विमानतळस्थळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचले. त्यांच्यासमोर चिपी, परुळेमधील लोकांनी व्यथांची मांडणी केली.
नियोजित विमानतळासाठी अतिरिक्त जमीन घेण्यात आली. त्यानंतर मोठय़ा संघर्षांमुळे, उठावामुळे अतिरिक्त जमीन स्थगिती उठविली. मात्र आता भूसुरुंगामुळे जवळपासच्या घरांना धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावेळी विमानतळ ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी येत्या दोन वर्षांत विमानतळ पूर्ण होईल असे सांगितले. तसेच लोकांनी नुकसानभरपाईची मागणीही यावेळी केली.
चिपी विमानतळस्थळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी वेळ दिला. या दौऱ्यात पत्नी सौ. रश्मी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक व पदाधिकारी उपस्थित होते.
आरवली येथील श्रीदेव वेतोबाचे दर्शन घेताना ठाकरे यांनी देवाला चपला भेट दिल्या. या ठिकाणी समितीने त्यांचा सत्कार केला. मात्र बोलण्याचे त्यांनी टाळले. या मार्गावर ठाकरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौटुंबिक देवदर्शन घेताना उपस्थिताना दिलासाही दिला. देवदर्शन घेणाऱ्या मंदिरात त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल गाऱ्हाणे घालण्यात आले. देवदर्शनाने उद्धव ठाकरे खूश होते. त्यांचे कुटुंबच या दौऱ्यात शिवसेनेचे उत्स्फूर्त स्वागत स्वीकारत होते.
आपण कोकण दौऱ्यात कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही किंवा बोलणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगून टाकले. आपण कोकणच्या जनतेला भेटण्यासाठी आलो आहे. कोकणच्या जनतेने शिवसेनेशी असणारे अतूट नाते जोपासत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भरभरून यश दिले आहे. त्यामुळे आता विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे त्यांनी आरोंदा व नाणोस येथे सांगितले.
कोकणाच्या जनतेने मांडलेल्या व्यथा, प्रश्न आपण मुंबईत गेल्यावर खासदार व आमदार यांच्या माध्यमातून सोडविणार आहे. कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे असे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली आणि लोकांनी व्यथाही मांडल्या आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांचे पुढील विकासाचे धोरण काय असेल याकडेच सर्वाचे लक्ष आले.