युतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन फडणवीस-ठाकरे यांची २४ मार्चला सभा

(संग्रहित छायाचित्र)

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन फडणवीस-ठाकरे यांची २४ मार्चला सभा;  १५ मार्चपासून समन्वय मेळावे

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेची पुन्हा युती झाल्यानंतर राज्यभरातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे १५, १७ आणि १८ मार्च रोजी राज्यात विभागनिहाय संयुक्त मेळावे घेणार आहेत. त्यानंतर २४ मार्चला कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

भाजप आणि शिवसेनेने संयुक्तपणे मतदारांसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि प्रचाराची व्यूहरचना ठरविण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तर शिवसेनेकडून या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दोन्ही पक्षांतील संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर युती झाल्याने आता निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोमीलन आवश्यक असल्याने खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांचे विभागनिहाय समन्वय मेळावे घेण्याचे या वेळी निश्चित झाले. निवडणूक प्रचाराची मदार ज्यांच्यावर प्रामुख्याने असणार आहे ते पक्षाचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सक्रिय कार्यकर्ते यांचा त्यात समावेश असावा असे ठरवण्यात आले.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र असे सर्व विभाग डोळ्यांसमोर ठेवून या संयुक्त  मेळाव्यांची आखणी करण्यात आली आहे. १५ मार्चला दुपारी अमरावतीपासून त्याची सुरुवात होईल. त्याच दिवशी रात्री नागपूरमध्ये मेळावा होईल. १७ मार्चला दुपारी औरंगाबादमध्ये तर रात्री नाशिकमध्ये आणि १८ मार्चला दुपारी नवी मुंबईत तर रात्री पुण्यात संयुक्त मेळावा होईल. मुंबईतील कार्यकर्त्यांचा संयुक्त  मेळावा कधी घ्यायचा याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. संयुक्त मेळाव्यातून कार्यकर्त्यांचे मनोमीलन घडवल्यानंतर रविवार २४ मार्च रोजी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन सायंकाळी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांची पहिली  प्रचारसभा होणार आहे.

’ कोकण- सुभाष देसाई (शिवसेना) आणि रवींद्र चव्हाण (भाजप)

मतदारसंघ- रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा मतदारसंघ क्षेत्र)

’ ठाणे-पालघर- एकनाथ शिंदे (शिवसेना) आणि रवींद्र चव्हाण (भाजप)

मतदारसंघ- ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी

’ पश्चिम महाराष्ट्र- नीलम गोऱ्हे (शिवसेना) आणि गिरीश बापट (भाजप)

मतदारसंघ- पुणे, बारामती, शिरूर, सोलापूर, माढा, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून)

’ दक्षिण महाराष्ट्र- नितीन बानगुडे-पाटील (शिवसेना) आणि चंद्रकांत पाटील (भाजप)

मतदारसंघ- कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा

’ उत्तर महाराष्ट्र- दादा भुसे (शिवसेना) आणि गिरीश महाजन (भाजप)

मतदारसंघ- नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी

’ मराठवाडा- अर्जुन खोतकर (शिवसेना) आणि पंकजा मुंडे(भाजप)

मतदारसंघ- हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद

’ विदर्भ- डॉ. दीपक सावंत (शिवसेना) आणि चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

मतदारसंघ- बुलडाणा, अकोला, वाशिम-यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली

प्रत्येक विभागात दोन नेत्यांकडे मतदारसंघांची जबाबदारी

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातील समन्वय कायम राहावा आणि कोणत्याही पक्षाकडून-कार्यकर्त्यांकडून आगळीक होऊ नये यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघांची विभागनिहाय जबाबदारी भाजप-शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक विभागासाठी एक भाजप तर एक शिवसेनेचा असा दोन नेत्यांचा गट नेमण्यात आला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतील रणछोडदासांची पळापळ सुरू झालेली असताना शिवसेना-भाजप युतीने प्रचारात मुसंडी मारली आहे.

– सुभाष देसाई, शिवसेना नेते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lok sabha election 2019 bjp shiv sena alliance campaign start from kolhapur