राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार हे दूरदृष्टीने विचार करुन निर्णय घेतात. राजकीय निर्णय आणि लोकांच्या हिताचे निर्णय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, असं मत कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आपण निर्णय घेताना अनेकदा शरद पवार या ठिकाणी असते तर कसा निर्णय घेतला असता असा विचार करुन निर्णय घेतो, असंही स्पष्ट केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> : “पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”; रोहित पवारांचे रोखठोक मत

सर्वासामान्यांमध्ये रमणारा नेता म्हणून रोहित पवार यांची ओळख असल्याने मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांना वेगवेगळ्या घटनांचा संदर्भ देत, रोहित पवार हे नक्की कुठलं रसायन आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहित यांनी मी सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे माझ्या जबाबदाऱ्या पार पाडून जगणारा व्यक्ती असल्याचं सांगितलं. “मी लहानपणी जसा होतो, कॉलेजमध्ये जसा होतो आताही तसाच आहे. निवडणुकीच्या आधी जसा होतो आताही तसाच आहे. रोहित पवार ही व्यक्ती पदामुळे किंवा व्यवसायिक क्षेत्रात चांगलं काम केल्याने बदलणाऱ्या व्यक्तींपैकी नाही. कोणत्याही सर्वसाधारण सामान्य व्यक्तीप्रमाणे मी माझ्या जबाबदाऱ्या पार पडतो आणि सामान्यप्रमाणेच जगतो. मला नाटक करणं जमत नाही. मी असाच आहे आणि यापुढेही असाच राहणार. मग त्यामध्ये कुठे माझ्या मुलांसाठी खेळणी घ्यायला जा, कार्यकर्त्यांशी, लोकांशी चर्चा करणं, पत्रकारांशी गप्पा मारा यासारख्या गोष्टी मी अनेकदा करतो. मी असाच आहे. यात वेगळं असं काहीच नाहीय,” असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार या नावापासून शरद पवार हे नाव कधी वेगळं होऊ शकत नाही. त्यामुळेच कार्यपद्धतीचा तुमच्यावर किती प्रभाव आहे किंवा एखाद्या अडचणीच्या प्रसंगी या ठिकाणी शरद पवार असते तर काय केलं असतं, असा विचार करुन तुम्ही कधी निर्णय घेता का?, असा प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “कुठलाही निर्णय घेताना साहेबांनी (शरद पवार यांनी) हा निर्णय कसा घेतला असता याचा मी विचार करतो. कारण ते निर्णय घेताना कधीही तात्पुरत्या स्वरुपाचा निर्णय घेत नाहीत. ते कायम दूरदृष्टीने विचार करुन निर्णय घेतात. म्हणजे आज घेतलेला निर्णय लोकांना पुढे पाच वर्षांनी, दहा वर्षांनी किंवा नंतर कधीतरी उपयोग झालाच पाहिजे या हेतूने निर्णय घेतला जातो,” असं रोहित म्हणाले.

नक्की वाचा >> शरद पवारांनी विचारलेला ‘तो’ प्रश्न आणि कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय; रोहित पवारांचा खुलासा

तसेच या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी लोकांच्या उपयोगाचे आणि राजकीय निर्णय दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं मत मांडलं. “राजकीय निर्णयाबद्दल बोलायचं झालं तर तो त्या त्यावेळी त्या परिस्थितीनुसार घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे राजकीय निर्णय हे वेगळे असतात आणि लोकांच्या विकासाचे निर्णय हे वेगळे असतात. लांबचा विचार करुन निर्णय घेतला तर त्याचा फायदा सर्वसामान्यांना अधिक होतो,” असं रोहित म्हणाले. याच वेळी रोहित पवार यांनी, “राजकीय शरद पवार कोणालाच कळणार नाहीत” असंही सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta exclusive interview with rohit pawar no one will ever understand political aspect of sharad pawar says rohit pawar scsg
First published on: 15-05-2021 at 11:07 IST