उपनगरीय सेवेकडे रेल्वे प्रशासनाचा काणाडोळा

मुंबई ते कटरा दरम्यान धावणाऱ्या स्वराज एक्स्प्रेस तसेच मैसूर-अजमेर एक्स्प्रेसला शुक्रवारपासून पालघर रेल्वे स्थानकात थांबा दिल्याने कटरा, बेंगलोर आणि चेन्नई या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट गाडी उपलब्ध झाली आहे. पश्चिम रेल्वेने गेल्या सहा महिन्यांत सात लांबपल्ल्याच्या गाडय़ांना पालघर स्थानकात थांबा दिला आहे. तरीही हजारो दैनंदिन प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या उपनगरीय सेवेमध्ये गेल्या अनेक वर्षांत विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे उपनगरी सेवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांच्या नशिबी उपेक्षा आली आहे.

१२४७१ वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्स्प्रेस ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी धावणारी गाडी पालघर येथे सकाळी ९.१८ वाजता थांबणार आहे. हीच गाडी १२४७२ परतीच्या प्रवासात बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार या दिवशी पालघर येथे दुपारी ४.१८ वाजता पालघर येथे थांबणार आहे.

त्याचप्रमाणे १६२०९ अजमेर-मैसूर गाडी रविवार आणि शुक्रवार या दिवशी पालघर येथे थांबणार असून, ही गाडी रात्री ९.५५ मिनिटांनी पालघर स्थानकात थांबेल तर १६२१० मैसूर-अजमेर एक्स्प्रेस ही गाडी दर बुधवार व शुक्रवारी पालघर येथे रात्री ११.३६ वाजता थांबणार आहे. या गाडय़ांना सहा महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशाच प्रकारे इतर पाच लांब पल्लय़ांच्या गाडय़ांना पालघर येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबे देण्यात आले होते. मात्र असे असताना मुंबईकडे हजारो प्रवासी प्रवास करत असताना गर्दीच्या वेळेत डहाणूकडून थेट चर्चगेटपर्यंत तसेच सायंकाळी परतीच्या प्रवासासाठी उपनगरीय सेवा वाढवण्याच्या मागणीला पश्चिम रेल्वेने पुरेशा प्रमाणात प्रतिसाद दिला नसल्याचे दैनंदिन प्रवाशांचे म्हणणे आहे.

‘वाढीवसाठी प्रयत्न’

वलसाडपर्यंत येणारी इंटरसिटी एक्स्प्रेस डहाणूपर्यंत विस्तारित करण्यात यावी यासाठी पाठपुरावा सुरू असून वसई रोड, विरार, पालघर  व डहाणू या रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, स्थानकात सरकते जिने, प्रवासी पूल नव्याने उभारणे, त्याचप्रमाणे पालघर नवनगर इतर ठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणी संदर्भात प्रशासकीय पातळीवर काम सुरू असल्याचे त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले होते. काही महिन्यात या भागाला वाढीव उपनगरीय सेवा तसेच वाढीव बेटाकडे जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे पुलावरून जाण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले.