प्रेमप्रकरणातून रॉकेल ओतून आग लावून घेणाऱ्या प्रेमी युगलाने कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले पण शेवटच्या क्षणी तरुणाने रॉकेल ओतून जाळल्याचा जबाब दिला. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला पण पहाटेच त्या तरुणाचे निधन झाल्याने या प्रकरणातील वस्तुस्थिती दडली. निरवडे येथील तरुणीशी प्रेमाचे चाळे करणारा मळेवाड येथील नंदकिशोर रवींद्र नाईक (२४) हा तरुण मुलीच्या घरी आला. संध्याकाळी घरात दोघीच होत्या. त्यादरम्यान भांडण झाले. रॉकेल ओतून जाळून मारण्याच्या या प्रकरणात प्रेमी युगुलाने कोणाविरोधातही आमची तक्रार नसल्याचे प्रथम जबाबात पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील यांच्याशी बोलताना म्हटले आहे. या प्रकरणातील नंदकिशोर नाईक व ती मुलगी ७० टक्के भाजली होती. त्यांच्यात प्रेमाच्या त्रिकोणातून भांडण झाल्याचे बोलले जात होते, पण शेवटी दोघांचीही तक्रार नव्हती. गोवा बांभुळी रुग्णालयात उपचार घेणारे हे प्रेमी युगूल काल संध्याकाळपर्यंत प्रकृतीने ठीकठाक होते. काल बुधवारी रात्रौ मुलीने पोलिसांना जबाब दिला. त्यात नंदकिशोरने पाच हजार रुपये मागितले. ते पैसे देण्यास असमर्थता दर्शविली म्हणून त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची धमकी दिली. त्यानंतर रॉकेल ओतून मला जाळले. तो जात असताना हात पकडून मिठी मारल्याने आम्ही जळालो असे म्हटले. या तरुणीने नंदकिशोर नाईकविरोधात तक्रार देताच त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला, पण त्याचे गुरुवारी पहाटेच निधन झाले. तरुणीही कोमात असल्याचे पोलिसांनी सांगितले.