श्रीगोंदा येथे रविवारी सकाळी १० च्या सुमारास सुनिल (ताराचंद ) दशरथ ससाणे (वय ५० वर्षे, रा. श्रीगोंदे) यांचा डोक्यात दगड घालून एक तथाकथित वेडा अनिल सावंत (रा. श्रीगोंदा) याने खून केला. ससाणे बगाडे कॉर्नरवर भंगार गोळा करीत असताना हा प्रकार घडला. ही घटना समजताच तेथे श्रीगोंद्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मयताचा भाऊ महादू ससाणे याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ती भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दाखल करून घेतली असून पोलीस निरीक्षक इंगळे यांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
श्रीगोंदा येथे सध्या पाच ते सहा तथाकथित वेडे फिरत असतात. या वेडय़ांनी शहरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. हे वेडे नगर पालिकांच्या कचराकुंडीत बसून राहणे, रस्त्याने फिरणे, महिलांचा पाठलाग करणे, भर चौकात अश्लील शिव्या देणे असे प्रकार करतात. यापूर्वी ज्ञानेश्वर अरुण जाधव (रा. कैकाड गल्ली, श्रीगोंदा) याने भर शनीचौकात प्रा. तुकाराम दरेकर यांच्या स्नूषा जयश्री सुनिल दरेकर व त्यांच्या बरोबर असलेल्या रत्ना वाबळे ( रा. हनुमाननगर) या हळदी-कुंकवासाठी जात असतांना त्यांना दगड फेकून मारला. त्या दडाने जयश्री दरेकर यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. तोच दगड डोक्यात लागला असता तर विपरीत घडले असते. ज्ञानेश्वर जाधव यांच्या विरोधात तक्रार देऊ नही पोलिसांनी त्याचा बंदोबस्त न केल्याने रविवारी ससाणे यांच्या खुनाचा प्रकार घडला. १२ फेब्रुवारी २०१७ पर्यंत श्रीगोंदा पोलिसांनी श्रीगोंद्यातील वेडय़ांचा बंदोबस्त न केल्यास श्रीगोंद्यातील नागरिकांना बरोबर घेऊ न १३ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीगोंदा येथे शनीचौकात रास्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. दरेकर यांनी दिला आहे.