प्रख्यात शिल्पकार विठोबा पांचाळ यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेले ‘तुतारी शिल्प’ म्हणजे सर्वसामान्य माणसातील क्रांतीचे प्रतीक आहे. कवी केशवसुत यांच्या ‘तुतारी’ या प्रसिद्ध कवितेतून या शिल्पाची निर्मिती झाली आसल्याचे उद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी काढले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात ‘तुतारी शिल्प’ अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. तुतारी शिल्पाचे अनावरण आमदार संजय केळकर, आमदार उदय सामंत, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, शिल्पकार विठोबा पांचाळ, बुकगंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नगराध्यक्ष राहुल पंडित,  कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, स्मारक व्यवस्थापक गजानन पाटील, विश्वस्त भास्करराव शेटे, अरुण नेरुरकर आदींच्या उपस्थितीत झाले.

पद्मश्री कर्णिक यांनी या वेळी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. स्मारकाच्या उद्घाटनाला कुसुमाग्रज आले असता त्यांनी या स्मारकाला कवितेची राजधानी, तसेच काव्यतीर्थ संबोधले, यातच सर्वकाही आल्याचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणाले. आमदार संजय केळकर यांनी या प्रसंगी कोमसाप, साहित्य महामंडळ आणि मसाप एकत्र आल्याने संपूर्ण साहित्यक्षेत्र एकत्र आल्याचे संबोधले. तर आमदार उदय सामंत यांनी साहित्यात या संस्थांची साहित्यक्षेत्रातील ही युती मधु मंगेश कर्णिकच करू शकतात असे म्हटले. मालगुंडमधील या स्मारकाला येत्या १५ दिवसांत शासनाकडून येणारा ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त होईल, अशी ग्वाही आमदार सामंत यांनी दिली.

प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अतिशय पोटतिडकीने सर्वत्र मराठीची मुळाक्षरे देवनागरीत ठसठशीत असावीत, असे मत मांडले. प्रास्ताविकात अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी या सोहळ्याचे महत्त्व विशद केले. कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी शुभेच्छा संदेश सांगितले. तर आभारात गजानन पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला साहित्यरसिकांची चांगली उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमादरम्यान ‘झपुर्झा’ या विशेषांकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्मारकाला नवस्वरूप देणाऱ्यांपकी शिल्पकार विठोबा पांचाळ, बुकगंगा डॉट कॉमचे मंदार जोगळेकर, बांधकाम व्यावसायिक संतोष तावडे, आíकटेक्ट निखिल नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.