महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी लहान बाळाला घरातच जन्म दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. तपासाअंती या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह नऊ जणांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.

पीडित मुलगी महाबळेश्वरमध्ये मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवते. मुख्य आरोपी सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार करत केले, ज्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी या मुलीची घरातच प्रसुती करण्यात आली ज्यावेळी तिने एका लहान मुलीला जन्म दिला. याबाबत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांना याबाबत माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देली. संबंधित अल्पवयीन मुलगी व कुटुंबियांना विश्वासात घेत माहिती घेतली.

संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र पोलीस उप विभागीय अधिकारी डॉ शीतल जानवे यांनी विश्वासात घेत तपास सुरू केला संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात धमकावल्या व मदत केल्याप्रकरणी आणखी ११ जणांना अटक केली.
हा प्रकार घडल्यानंतर नवजात मुलीला मुंबईतील चौरसिया कुटुंबाकडे सोपवण्यात आलं. या कुटुंबाला नवजात मुलगी सोपवण्यात माजी नगराध्यक्ष बावळेकर यांच्या दोन मुलांचा सहभाग असल्याचं समोर आल्यामुळे त्यांच्यावरही अत्याचार आणि आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची कुठेही वाच्यता होणार नाही याची काळजी आरोपींनी घेतली होती. या प्रकरणी मुलीला दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा वापर न केल्यामुळे सहभागी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही बावळेकर यांचा मुलगा योगेशवर व्हॉट्स अपवर अश्लील चित्रफीत व्हायरल करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे सध्या साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये खळबळ माजली असून पोलीस सदर प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahableshwar rape case minor got raped by corporators sons in satara mahableshwar vsk
First published on: 24-09-2021 at 09:54 IST