सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात सत्कारासाठी व्यासपीठावर बोलाविलेल्या साध्वीने ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांशी संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न व्यासपीठावरील उपस्थित साधू-महंतांनी हाणून पाडला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला. साधू-महंतांच्या वर्तनावर संबंधित साध्वीने आक्षेप घेत संतपद मिरविणाऱ्यांमध्ये संतांसारखी वागणूक आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला. विविध कारणांमुळे वाद-विवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सिंहस्थाच्या शुभारंभाप्रसंगी घडलेल्या या प्रकाराबद्दल भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले.
साधुग्राममध्ये साध्वींना स्वतंत्रपणे जागा मिळावी यासाठी मागील दीड ते दोन महिन्यांपासून प्रयत्न करणाऱ्या साध्वी त्रिकालभवंता सरस्वतीजी यांच्याबाबत हा प्रकार घडला. मंगळवारी सकाळी रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मंत्रिगणांसह अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, नाणीजचे नरेंद्र महाराज, जगद्गुरु हंसदेवाचार्य यांच्यासह विविध आखाडय़ांचे महंत उपस्थित होते. व्यासपीठावर जैन साध्वी मधुस्मिता आणि त्रिकालभवंता सरस्वतीजी यांना स्थान देण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर उभयतांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर मधुस्मिताजी यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांचे भाषण झाल्यावर त्रिकालभवंता सरस्वती यांनाही भाविकांशी संवाद साधायचा होता. यामुळे त्यांनी ध्वनिक्षेपक हाती घेतला आणि व्यासपीठावर वेगळेच वातावरण तयार झाले. त्यांना बोलण्यास ग्यानदास यांच्यासह काहींनी आक्षेप घेतला. त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी बोलणे सुरू केल्यावर ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद करण्यात आली, यामुळे त्यांचे बोलणे कोणाला ऐकू गेले नाही. दरम्यानच्या काळात ग्यानदास महाराजांनी साध्वीच्या हातातील ध्वनिक्षेपक काढून घेतला. हा नेमका काय प्रकार आहे हे मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आले नाही. या प्रकाराने सोहळ्याला गालबोट लागले.
या संदर्भात संबंधित साध्वीशी संपर्क साधला असता महंतांच्या कार्यशैलीवर त्यांनी टीकास्त्र सोडले. आपल्याला व्यासपीठावर बोलावल्याबद्दल आभार मानणार होते. त्यासाठी ध्वनिक्षेपक हाती घेतल्यावर तो खेचून घेण्यात आला. महंतांचे हे वर्तन चुकीचे असून हेच स्त्रीदाक्षिण्य काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, शाही स्नानासाठी स्वतंत्र वेळ मिळावी तसेच साधुग्राममध्ये साध्वींना इतर आखाडय़ांमध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करीत असूनही प्रशासनाने त्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. व्यासपीठावरून साध्वी पुन्हा तो मुद्दा उपस्थित करतील, या साशंकतेने त्यांना बोलू दिले गेले नसल्याची कुजबुज सुरू होती.