महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २०० जागांचं स्वप्न पाहणाऱ्या भाजापाला यंदा मतदारांनी चांगलाच फटका दिला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपाच्या जागांमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसतंय. अनेक मोठ्या जागांवर भाजपाच्या दिग्गज उमेदवार पिछाडीवर आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघात भाजपाच्या महापौर मुक्ता टिळक यांनी विजय नोंदवला आहे.
कसबा मतदारसंघ हा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा मतदारसंघ आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत गिरीश बापटांना खासदारकीची लॉटरी लागल्यानंतर विधानसभेसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मतदारसंघात काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांचं टिळक यांना आव्हान होतं. त्यातच मनसेच्या अजय शिंदेंकडूनही यंदा कडवी टक्कर पहायला मिळेल असा अंदाज होता. मात्र या सर्व शक्यता फोल ठरवत मुक्ता टिळक यांनी बाजी मारली आहे. अंतिम आकडेवारी हाती येण्याआधी मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ता टिळक यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत.