विधानसभेच्या निवडणुकांचा वेग वाढला असून मावळ मतदारसंघात उलथापालत झाली आहे. संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपाच्या दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत भाजपा नगरसेवक सुनिल शेळके यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे मावळातील राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे.
बंडाच्या पवित्र्यात असणारे भाजपा नगरसेवक सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व घटनांमुळे मावळमधील राजकारणात भाजपाला धक्का बसला आहे. विधानसभेतच ही उलथापालत झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात अनेक नेत्यांची भरती सुरू होती. मात्र, ऐन निवडणुकांमध्ये भाजपामधील बंडखोरी पुढे येताना दिसत असून नाराज नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सुनील शेळके हे भाजपा नगरसेवक आहेत. ते तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत. भाजपातील निष्ठावंत नेते म्हणून शेळके यांची ओळख होती. भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुनील शेळके हे इच्छुक होते. मात्र, संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे आज (गुरूवार) त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर भेगडे हे हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मावळमधील परिस्थिती पाहता विधानसभा चुरशीची होणार यात काही शंका नाही.