नुकतेच भाजपावासी झालेले नितेश राणे यांचा संघाच्या दसऱ्या मेळाव्यातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आरएसएसची विचारधार समजून घेण्यासाठी संघाच्या कार्यक्रमाला गेलो. ज्या पक्षात प्रवेश केला त्याची ध्येयं-धोरणं, विचार जाणून घेतले, असे राणे यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.’

भाजपा व संघावर कायम टीका करणाऱ्या नितेश राणे यांनी मंगळवारी संघाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांबरोबर जमिनीवर बसून हजेरी लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. संघ शाखेत शिस्तपालन करतानाचा त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी टीका केली आहे. त्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले. ‘नितेश राणेंना ओळखणारे ट्रोल करणार नाहीत’, असे म्हणत नितेश राणे यांनी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

नितेश राणे यांच्या भाजपाप्रवेशानंतर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत कणकवलीमधून उमेदार दिला आहे. शिवसेनाचा तुम्हाला विरोध आहे का? असे प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ‘माझ्यापुढे कुणाचंही आव्हान नाही, लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.’ कणकवलीमधूल शिवसेनेकडून सतीश सावंत यांना नितेश राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकताच भाजपात प्रवेश केलेले नितेश राणे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवास हजेरी लावली होती. देवगडमधील जमसंड येथील संघाच्या संचलनात नितेश राणे यांनी भाग घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्याचे पाहायला मिळाले. राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी चक्क जमिनीवर बसून संघाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विजयादशमीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शस्त्रपूजन व संचलनाचा कार्यक्रम घेतला जातो. संघाच्या या कार्यक्रमांना स्वयंसेवकांसह भाजपातील दिग्गज नेत्यांपासून सामान्य कार्यकर्ते देखील आवर्जुन हजेरी लावत असतात. त्यात आता नव्यानेच भाजपावासी झालेल्या राजकीय नेत्यांचा देखील समावेश होताना दिसत आहे.