महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे

Maharashtra Health Minister Rajesh Tope, Restirctions in Maharashtra, Uddhav Thackeray,
करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे

करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे.

“११ जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अद्यापही जास्त असल्याने तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्यासंबंधी आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवत आहोत. मुख्यमंत्री यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

निर्बंध काही प्रमाणात शिथिल?

पुढे बोलताना त्यांनी इतर २५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट अतिशय कमी आहे, जिथे वाढीचा दर कमी आहे तेथील निर्बंध शिथिल करत दुकानांना ४ ऐवजी अतिरिक्त वेळ सुरु ठेवण्यासाठी मुभा देऊ शकतो असं सांगितलं.

लोकलसंबंधी दोन दिवसांत निर्णय

दरम्यान लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानही द्यायची का याचा निर्णय दोन दिवसांत होईल. मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत.

“जगातील अनेक देशांमध्ये तिसरी लाट आली आहे. पण लसीकरण झाल्याने त्याची दाहकता कमी आहे. लागण होत असली तरी मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे हे संक्रमण गंभीर स्वरुपाचं नाही. तिसऱ्या लाटेसंबंधी बोलताना अर्थचक्र चाललं पाहिजे याकडेही लक्ष दिलं पाहिजे. फार काही निर्बंध घालूनही चालत नाही. त्यामुळे काही निर्बंध शिथिल करण्याबात मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

१४ जिल्ह्यात करोना निर्बंध शिथिलता योजना!

“तिसरी लाट येईल तेव्हा येईल, मात्र राज्याची तयारी आहे का हे महत्वाचं आहे. आमची तयारी झाली आहे. जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी केली आहे. सर्व बाजूंनी आपण तयार आहोत,” असं सांगताना राजेश टोपे यांनी लोकांना नियमांचं पालन करा आणि लसीकरणाला प्रतिसाद द्या असं आवाहन केलं.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती

दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यात रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली. यानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल केले जातील. सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे. दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी  मंत्र्यांनी केली.

राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे. मृत्यूदरही जूनमधील २.३८ टक्क्यांवरून १.२४ टक्के  इतका कमी झाला आहे. उपचाराधीन  रुग्णांची संख्याही  ८२ हजारांवर आली आहे. ही घट ७२.८८ टक्के  आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्य़ांत ४९ हजार रुग्ण आहेत.

तर मुंबई, अहमदनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांत २० हजार ३८६ रुग्ण आहेत. अशारितीने एकू ण १० जिल्ह्य़ांत राज्यातील एकूण ८२ हजार सक्रीय रुग्णांपैकी ६९ हजार ६०८ रुग्ण आहेत. म्हणजेच राज्यातील सक्रीय रुग्णांच्या ८४ टक्के  रुग्ण हे या १० जिल्ह्य़ांत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

आज बैठक

मुख्यमंत्री उपनगरी रेल्वे प्रवासाची सवलत देण्यासह निर्बंध शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरोग्यविषयक कृती गटातील तज्ज्ञ डॉक्टरांशी गुरुवारी चर्चा करणार असून त्यानंतर या सर्व गोष्टींवर निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी   सांगितले. रेल्वे गाडय़ांमध्ये सामान्यांना प्रवासास परवानगी देण्याची मागणी होत असली तरी तशी परवानगी लगेचच मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संके त देण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra health minister rajesh tope on ease restrictions in state sgy

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या