सोमवारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसींच्या) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पहायला मिळाले. भाजपाने विधानसभेच्या आवारामध्येच प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घातल राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले.

रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजदंड उचलण्यासाठी पुढे गेले असता तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्टंटबाजी करु नका. तुम्हाला बोलायची संधी नक्की मिळेल असं जाधव यांनी राणा यांना सांगितलं. मात्र असं करुनही राणा थांबले नाहीत. त्यामुळेच जाधव यांनी सभागृहातील आपल्या अध्यक्षांच्या खुर्चीमधून उठून रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले. त्यानंतर रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं.

नक्की वाचा >> राजदंड पळवण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी घडलाय?

सोमवारी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीही राजदंड पळवण्याचा प्रयत्न भाजपा आमदारांकडून करण्यात आलेला. केंद्राकडून ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी इमपेरिकल डेटा घेण्याबाबतचा ठराव सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव विधानसभेत पास होताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन अनेक आमदार वेलमध्ये उतरल्याचं पहायला मिळालं होतं. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीचे भान ठेवतात आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेल मधून आपल्या जागेवर नेलं. राजदंड पळवण्यावरुन सुरु झालेल्या गोंधळातून नंतर धक्काबुक्की झाली. याच मुद्द्यावरुन नंतर भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आलं.

राजदंड महत्वाचा का?

विधानसभेमध्ये अधिवेशनादरम्यान अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. राजदंड हा सभागृहाचा सर्वोच्च सन्मान म्हणून ठेवण्यात येतो. मात्र अनेकदा राजदंड उचलले जातात. राजदंड उचलण्याची कृतीही सामान्यपणे सभागृहात एखाद्या मुद्द्यावरुन गदारोळ झाल्यानंतर पहावयास मिळते. विधानसभेमध्ये विधानसभा अध्यक्ष व सभा सचिवालयचा प्रमुख असतो. अध्यक्ष हेच विधानसभेचे पीठासीन अधिकार असतात. त्यामुळेच त्यांना संविधान, प्रक्रिया आणि नियमांबरोबरच सभागृहाच्या परंपरांनुसार काही विशेष अधिकार दिले जातात. विधानसभेप्रमाणे महानगरपालिकांच्या सभागृहाच्या बैठकींच्या वेळीही राजदंड ठेवला जातो.

सभागृहामध्ये सर्वाधिक अधिकार हे अध्यक्षांकडे असतात. सभागृह सुरळीत सुरु ठेवण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. पारंपारिक पद्धतीनुसार अध्यक्षांच्या आसनासमोर राजदंड ठेवला जातो. सभा संपेपर्यंत राजदंड तिथेच ठेवला जातो. राजदंड हा सभागृहातील सर्वोच्च सन्मानाचे प्रतिक असल्याने तो उचलून सभागृहाबाहेर नेल्यास सभागृहाचं कामकाज थांबवावं लागतं. आपलं म्हणणं मांडण्यासाठी किंवा सभागृहाने ऐकून घ्यावं या हेतूने अथवा एकादा ठराव व निर्णय न पटल्यास सदस्य राजदंड पळवून सभागृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र राजदंड उचलला तरी तो थेट सभागृहाबाहेर नेण्याची घटना फारच क्वचित होते.