बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील माजी उपसरपंचाचा डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ५ सप्टेंबर २०२५ ची असल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
गोविंद बर्गेंच्या मृत्यूला नर्तिका जबाबदार?
गोविंद बर्गे याचं वैराग जवळील सासुरे येथील एका नर्तिकेसोबत प्रेम प्रकरण होते. गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. या व्यवसात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्यानंतर काही काळात हा व्यवसाय करत असताना त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तिकेशी झाली. त्यानंतर ही ओळख जवळीकमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. प्रेमात असताना गोविंद यांनी नर्तिकेला सोन्याच्या नाण्यांसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्यात. एवढंच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वी पावणे दोन लाखांचा एक मोबाईल तिला दिला होता. सगळं सुरुळीत चालत असताना गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यात भांडणं सुरु झाली होती.
पोलिसांनी याबाबत काय सांगितलं?
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे नर्तिकेच्या गावी गेले होते. तिथे सासुरे गावातील परिसरात एका काळ्या रंगाच्या गाडीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी या गाडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे त्यांना काळ्या रंगाच्या गाडीत मृतावस्थेत गोविंद आढळून आला. तपास केल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यानंतर तिथे त्यांना एक पिस्तूल देखील आढळली आहे. जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच पिस्तुलीनेच गोविंदचा डोक्यात गोळी लागली आहे. पण गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली की ही हत्या आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
गोविंद बर्गेंच्या मित्राने काय सांगितलं?
पूजाकडून मिळणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचला होता. घटनेपूर्वी गोविंदने आपल्या मित्राला चंद्रकांत शिंदे याच्याशीही मन मोकळं करत “मी खूप निराश झालो आहे” असं सांगितलं होतं. गोविंदने पूजाला स्वतःचे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर सासुरे गावातील घर बांधण्यासाठीही आर्थिक मदत केली होती. तिचे सर्व हट्ट तो पूर्ण करत होता, मात्र तिच्या मागण्या वाढत होत्या अशी माहिती आहे, तिला गेवराईतील घर देखील तिच्या नावावरती करून हवं होतं, अशी माहिती आहे. दरम्यान, यामध्ये घातपाताची शक्यता काही नातेवाइकांनी व्यक्त केली असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मित्र परिवारांनी शंका उपस्थित करत या प्रकरणाची योग्य चौकशीची मागणी केली. गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून गोविंद बर्गे मानसिक तणावात होते. मागील पाच ते सहा दिवसांपासून ते अधिक तणावात होते. त्यांचा मोबाईल बंद होता असंही त्यांच्या मित्रांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं.
गोविंद बर्गे आणि पूजा यांची ओळख कशी झाली?
गोविंद बर्गे तमाशा बघण्यासाठी अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते. अशी माहिती मिळते आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
गोविंद बर्गेंच्या मृत्यूची बातमी समोर कशी आली?
९ सप्टेंबरच्या सकाळपासून एक काळ्या रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांना गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आली असून त्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोविंद बर्गे याने स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले या दृष्टीने देखील पोलीस सध्या तपास करत आहेत.