मुंबई : राज्यातील एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी चालक मोठय़ा प्रमाणावर घेण्यात असतानाच वाहकांचीही कमतरता महामंडळाला भासत आहे. त्यामुळे एसटीतून निवृत्त झालेल्या वाहकांची पुन्हा भरती करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात निकष ठरवण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. हे वाहक कंत्राटी पद्धतीनेच घेणार की अन्य प्रकारे यावर निर्णय होईल.

गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या संपामुळे राज्यातील एसटी सेवा अद्यापही सुरुळीत झालेली नाही. त्यामुळे कारवाया मागे घेण्याचे आश्वासन देऊन महामंडळाकडून कामगारांना कामावर परत येण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनालाही प्रतिसाद मिळालेला नसून ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही ४७ हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ७ हजाराहून अधिक चालक आणि ७ हजार ३४५ वाहक कर्तव्यावर हजर झाले असून सुमारे ४० हजार चालक, वाहक संपावरच आहेत. त्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले असून प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.

महामंडळाने एसटी सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या २ हजार २२५ कंत्राटी चालक आहेत. चालक भरती करतानाच वाहकांचीही कमतरता भासत असल्याने महामंडळाने नुकताच वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला होता. वाहतुक नियंत्रकांवर वाहकाची जबाबदारी देण्यात येणार होती. परंतु त्यालाही अल्पच प्रतिसाद मिळाला. याशिवाय तिकीट मशिनचा पुरवठा करणाऱ्या ट्रायमॅक्सनेही कंत्राटी वाहक देण्यास सुरुवात केली, मात्र तेही कमीच आहेत. महामंडळाने वाहकांची संख्या वाढवण्यासाठी निवृत्त वाहकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही निकषही ठरवण्यात येत असून त्यावर अंतिम निर्णय होत आहे. गेल्या चार वर्षांत निवृत्त झालेल्या वाहकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली जाईल आणि ज्या कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याची इच्छा असल्यास त्यांना अर्ज करण्यास सांगितले जाणार आहे. त्यांना कंत्राटी पद्धतीने घेणार की अन्य प्रकारे यावर अंतिम निर्णय होणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना विचारले असता, निवृत्त वाहक घेण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी निकष ठरवत असल्याचे सांगितले.

आणखी दोन हजार कंत्राटी चालक

एसटी महामंडळात सध्या दोन हजार २२५ कंत्राटी चालक कर्तव्यावर आहेत. आणखी दोन हजार चालक घेण्यात येणार आहेत. एका महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर त्यांना घेतले जात आहे. याशिवाय ११ हजार कंत्राटी चालकांचीही प्रक्रिया सुरु करण्यात आली असून ते दीर्घकाळासाठी असतील, अशीही माहिती दिली. हे चालक येताच एक-एक महिन्याच्या कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या चालकांचे कंत्राट संपुष्टात येईल.

न्यायालय सुनावणीकडे लक्ष

पाच महिन्यांपासून सुरु असलेला संप, मंत्रिमंडळाने विलीनीकरणाचा स्विकारलेला अहवाल यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे एसटी महामंडळ, कर्मचारी आणि प्रवाशांचेही लक्ष लागून आहे.