प्रशांत देशमुख, वर्धा
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची मागणी होत असतानाच राज्य शिक्षण मंडळाने शालांत परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कात दोनशेपट वाढ केल्याने पालक धास्तावले आहेत.
शालांत परीक्षेच्या तांत्रिक विषयासाठी वीस रुपये शुल्क आकारले जाते. आता हेच शुल्क ४०० रुपये प्रती विद्यार्थी आकारण्याचे फर्मान मंडळाने काढले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने विविध पक्षांनी विद्यार्थ्यांचे सर्व शुल्क माफ करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
शालांत परीक्षेला ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर बसतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास पसंती दिली आहे. यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स असे विषय निवडले जातात. त्याचे प्रात्यक्षिक पूर्ण केल्याखेरीज मुख्य परीक्षेस बसता येत नाही. ऑक्टोबरपासून मंडळाने प्रात्यक्षिक व मुख्य परीक्षेचे शुल्क आकारणे सुरू केले होते. शाळा पातळीवर प्रथम ते गोळा झाले. मात्र, आठवड्यापूर्वी मंडळाने वाढीव शुल्काचे फर्मान काढल्याने पालकांना धक्का बसला आहे. वाढीव शुल्काच्या निर्देशापूर्वीच वीस रुपये गोळा करणाऱ्या शाळांना आता तब्बल चारशे रुपये पालकांकडून आकारावे लागणार आहेत. मुदतीपूर्वी प्रात्यक्षिक शुल्क जमा करणाऱ्या पालकांच्या प्रश्नांना आता शाळेला सामोरे जावे लागणार आहे.
दुष्काळाच्या झळा बहुतांश ग्रामीण भागाला बसत आहेत. ही परिस्थिती काही मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणली. त्यावर प्रथम शुल्क वसूल करा, त्याची परतफेड पुढील वर्षी अनुदानातून केली जाईल, असे उत्तर मिळाले. काही शाळांतील शिक्षक पटसंख्या टिकवण्यासाठी पदरचे पैसे खर्च करीत विद्यार्थ्यांचा भार उचलतात. आता या शिक्षकांवर वाढीव शुल्क भरण्याची आपत्ती आली आहे.
ही वाढ अनाकलनीय
माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, ही वाढ अनाकलनीय आहे. मराठी शाळेतला ग्रामीण विद्यार्थी एवढे शुल्क भरण्यासाठी असमर्थ आहे. वेळेवर पत्र पाठवून ही वाढ करण्यात आली. बहुतांश शाळांनी वीस रुपयेप्रमाणे आकारणी केल्यावर आता वाढीव शुल्क भरण्यास पालकांची तयारी नाही. एकीकडे तंत्र शिक्षणास महत्त्व देण्याचा डांगोरा पिटला जातो. मात्र, असे अवास्तव शुल्क तंत्र शिक्षणाच्या मुळावरच उठणारे आहे. ही वाढ त्वरित रद्द करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील.