Maharashtra News Updates Today, 27 May 2022: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि संजय पवार या दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका निर्णयाक ठरणार आहे. या संदर्भातील भूमिका संभाजीराजे छत्रपती आज स्पष्ट करणार आहेत. तर दुसरीकडे ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर कारवाई केली असून छापे टाकल्याच्या मुद्यावरुन राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाचे पडसादही आज उमटण्याची शक्यात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनस्र्थापित करण्यासाठी समर्पित आयोगाचा सांख्यिकी अहवाल तसेच इतर बाबींची लवकर पूर्तता करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्यात. कर्नाटकातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शीवकुमार यांच्याविरोधात गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. तर दिल्लीमधील आयएएस अधिकाऱ्याने कुत्रा फिरवण्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर काढल्याच्या प्रकरणावरुन कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. तर तिकडे शेजराच्या पाकिस्तानमध्ये हिंसक आंदोलन सुरु असतानाच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदी सरकारवर स्तृतीसुमनं उधळताना इंधनदर कपातीच्या निर्णयाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गेले पाच दिवस रखडलेल्या र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अखेर सहाव्या दिवशी भारतभूमीच्या दिशेने आगेकूच सुरू केली. पुढील ४८ तासांत मोसमी वारे आणखी प्रगती करतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.