महाराष्ट्रामध्ये अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. यासंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या प्रवासासंदर्भातल्या निर्णयांबद्दल आता सरकारने खुलासा केला आहे.

करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून त्यावर आधारीत निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच जिल्ह्यांमध्ये प्रवासासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्रामधील अनलॉकसंदर्भात केलेल्या घोषणेमध्ये लोकल ट्रेनच्या प्रवासासंदर्भातील निर्बंधांवर अधिक स्पष्टता येण्यासाठी सरकारने खुलासा जारी केला आहे. लोकल ट्रेनच्या प्रवासासंदर्भातले निर्बंध लागू करण्याचे अधिकार संबंधित शहरांमधील आपत्ती व्यवस्थापन विभागांकडे देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- Maharashtra Unlock: नव्या नियमांमध्ये e Pass संदर्भातही मोठे बदल; अनेक जिल्ह्यांना दिलासा तर काही ‘जैसे थे’

त्यानुसार पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गटातील शहरांमध्ये लोकलच्या प्रवासावर निर्बंध लावण्यात येतील. या व्यतिरिक्त नव्या नियमांतर्गत मुंबई महानगरपालिकेकडून लोकल प्रवासासंदर्भात जे काही निर्बंध लावण्यात येतील, ते संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआरडीए रिजनला) लागू असतील. जर मुंबई महानगर क्षेत्रातल्या कोणत्याही भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाला लोकलच्या प्रवासावर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त निर्बंध लावायचे असतील, तर त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सल्ल्यानेच हे निर्बंध लावण्यासंदर्भातील निर्णय घेता येणार आहे, असं शासनाने स्पष्ट केलं आहे.


तर नव्या आदेशांनुसार आंतरजिल्हा प्रवासाच्या निर्बंधांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. पहिला गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यामध्ये वाहतूकीसाठी परवानगी देण्यात आली असून त्यासाठी ई पासची गरज पडणार नाही. मात्र पहिल्या गटात येणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करताना पाचव्या गटातील म्हणजेच संसर्गाचा धोका अधिक असणाऱ्या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असल्याच ई पासची गरज लागणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांनाही हाच नियम लागू आहे. संसर्गाचा धोका अधिक असलेल्या जिल्ह्यांमधून प्रवास करायचा असल्याच ई पास आवश्यक असणार आहे. पाचव्या गटातील जिल्हे वगळता इतर गटातील जिल्ह्यांमध्ये प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.

आणखी वाचा- Maharashtra unlock : तुमचा जिल्हा कोणत्या गटात; काय असतील निर्बंध?

पाचव्या गटातील जिल्ह्यांमध्ये ई पासची सक्ती कायम राहणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटामध्ये मोडतात. या जिल्ह्यांमधून बाहेर जाताना किंवा या जिल्ह्यांमध्ये येताना ई पास आवश्यक असणार आहे. या जिल्ह्यांमधून प्रवास करण्यासाठीही ई पास लागणार आहे. जिल्ह्यातील व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी काही विशेष कारणांसाठीच सवलत दिली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय कारणांसाठी किंवा अत्यावश्यक सेवेच्या कामासाठी प्रवास करण्यासाठी ई पास दिला जाईल.