महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वच नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2019 रोजी प्रकाशित
Maharashtra Government Formation : तीन डिसेंबरनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार -प्रफुल्ल पटेल
महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 27-11-2019 at 07:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2019 mla oath political live update jud
उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया यांना निमंत्रण दिलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते.
महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर अंतिम चर्चा झाली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. राज्याला एकच उपमुख्यमंत्री असेल आणि तो राष्ट्रवादीचा असणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचा होणार आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार होणार असल्याचे पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
भाजपा पाठिंबा देण्याचा निर्णय घेत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेला धक्कादायक वळण देणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. बुधवारी झालेल्या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या बैठकींनाही त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत पोस्टर झळकले आहेत. "आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या. भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडं पाहतोय," अशा आशयाचे पोस्टर बारामतीत लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक गेल्या तासाभरापासून वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. उद्या होणारा शपथविधी सोहळा आणि त्यानंतर मंत्रिपदाचं वाटप, याविषयी या बैठकीत चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे उद्या शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला देशभरातील राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसह चारशे शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.
दुपारी चार वाजता महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सह्याद्री अतिगृहात महाविकास आघाडीच्या बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. शरद पवार हे बैठकीसाठी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून निघाले आहेत.
शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीविरोधातील याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावं अशी मागणी हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशी यांनी याचिकेद्वारे केली होती. निवडणुकीपूर्वी झालेली युती तोडून नव्या आघाडीचं सरकार स्थापन करणं ही मतदारांची फसवणूक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत आणखी एक आघाडी सामील झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ १६९ वर पोहोचलं आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याची माहिती दिली आहे. "बहुजन विकास आघाडीचे नेते आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर आणि आ. राजेश पाटील यांनी आज माझी भेट घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. बहुजन विकास आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत," अशी माहिती चव्हाण यांनी ट्विटरवरून दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांनी जशी शिवसेना सांभाळली तसंच ते राज्यही सांभाळतील, असं म्हटलंय. तसंच शपथ घेतल्यानंतर खूप काम करावं लागतं आणि उद्धव ठाकरे ते योग्यरित्या करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. "राज्याचं काम पाहणं आणि पक्षाचं काम पाहणं यात फरक आहे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी पक्षाचं काम पाहिलं. शिवसेना पुढे नेली तिच प्रथा ते अंमलात आणतील आणि ते यशस्वी मुख्यमंत्री होतील," असंही त्यांनी नमूद केलं.
राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे जवळपास स्पष्ट झालं आहे. मनसेने महाविकास आघाडीबद्दल अद्याप कोणतीही भूमिका घेतली नव्हती. परंतु आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्याचं प्रश्न आपण विधीमंडळात मांडणार आहोत. तसंच बुलेट ट्रेन आणि नाणार सारख्या प्रकल्पांना आपला विरोध कायम राहिल, असंही त्यांनी बोलताना सांगितलं.
योग्य वेळ आल्यावर अजित दादांबद्दल बोलेन, असं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अजित पवार यांच्याबद्दर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
युवा म्हणून काम करताना सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच आलोय. आम्हाला महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे. मंत्रिमंडळाबाबत निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील, असं मत आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस आम्हाला सोबत घेऊन चालले नाहीत. मला, तावडे, बावनकुळे, यांना बाजूला सारलं. आम्हाला सोबत घेऊन गेेले असते तर नक्कीच २० ते २५ जागा वाढल्या असत्या. आरोप केले त्यांच्यासोबत का गेलात, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.
आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या बहुनज विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सत्ता आमची असेल, असं म्हणत महाविकासआघाडीला पाठिंबा देत असल्याचे संकेत दिले आहेत.
दुपारी १२ वाजता महाविकास आघाडीच्या बैठकीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या नावांवर आणि मंत्रीपदांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या हिताचा आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. भाजपाला राज्यात अघोरी प्रयत्न करूनही आपला निर्णय लादता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता दिल्लीतही एकत्र जाऊ असं सांगितलं आहे, असं सूचक विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे हे राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित आहेत. शपथविधीची माहिती देण्यासाठी ते राजभवानत दाखल झाले आहेत. उद्या संध्याकाळी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधीमंडळ राजकारणात उद्धव ठाकरेंचं पहिलंच पाऊल आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. उद्या संध्याकाळी शिवतीर्थावर ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.
आम्हाला अजित पवार परततील याचा विश्वास होता. जे काही घडलं ते कशामुळे घडलं, का घडलं हे माहित नाही. अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. कुटुंबाचे आहेत म्हणून ते परतल्याचा आनंद झाला त्यापेक्षा अधिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत आपल्यासंबंधी अनेक चुकीच्या बातम्या देण्यात आल्याची खंत बोलून दाखवली.
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे. दिलीप वळसे-पाटील, हरिभाऊ बागडे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ आदि दिग्गजांपासून शपथविधी सोहळ्याला सुरूवात करण्यात आली.
येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे सकाळीच विधानभवनात दाखल झाल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदारांनी ऐक्य दाखवलं याचा सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं.
महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान, या कालावधीत अनेक घडामोडी घडल्या. यावर प्रतिक्रिया देताना यावर मला काही बोलयचं नसून मी योग्य वेळी सर्वकाही बोलेन. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी असं म्हटलं आहे.