लंडन शहरातील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिक्षण घेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घर विकत घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. सन १९२१-२२ मध्ये डॉ. आंबेडकर राहत असलेले घर विकत घेण्याची इच्छा राज्य सरकारने केंद्राला पत्राद्वारे कळविली आहे. लंडनमधील किंग हेनरी रस्त्यावरील २,०५० चौरस फुटांच्या या घराची किंमत भारतीय रुपयांमध्ये सुमारे ४० कोटी इतकी आहे. लंडनमधील ‘द फेडरेशन ऑफ आंबेडकरीज अॅन्ड बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन’ (फाबो) संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला ही वास्तू ४० कोटी रूपयांमध्ये लिलावात काढण्यात आल्याची माहिती कळविली होती. त्यानंतर राज्य सरकारने घर विकत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, यासंबंधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील अनुकूल असल्याचेही राऊत यांनी सांगितले. ही वास्तू आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या जागेवर संग्रहालय उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्य सरकारकडून मंगळवारीच नागपूर येथे अधिवेशन सभागृह उभारण्यासाठी १३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर लंडनमधील ४० कोटींची ही वास्तू विकत घेणे राज्य सरकारसाठी फारसे अवघड नसल्याचे सांगितले जात आहे.