खामगाव येथे काँग्रेसचा विजय संकल्प मेळावा

अकोला : आरक्षण संपवण्याचे पाप मोदी सरकारकडून केले जात आहे. देशाचे  स्वातंत्र्य, संविधान धोक्यात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी चोरांविरुद्ध लढून लोकशाही जिवंत ठेवावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्ष संघटन बळकट करा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

खामगाव येथे आयोजित काँग्रेसच्या ‘विजय संकल्प’ मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, अनुसूचित जाती जमाती सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, आ. राजेश एकडे, आयोजक माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, अतुल लोंढे, माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

तीन काळे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी देशातील शेतकरी अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. त्या शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधान मोदींकडे वेळ नाही. महागाई व बेरोजगारीचे मोठे प्रश्न असून लोकसभा व राज्यसभेत पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. ओबीसींचे आरक्षण कमी केल्या गेले. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या नावावर ओबीसी मराठय़ांमध्ये वाद निर्माण केले आहेत, असा आरोप पटोले यांनी केला. ‘गोरे इंग्रज गेले आणि हे चोर आले’ अशी भावना आता जनतेमध्ये आहे. या चोरांना उखडून फेकण्यासाठी प्रचंड मेहनत घेत कामाला लागा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.

आगामी काळात खामगाव विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला.

नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी कामाला लागा, असे आवाहन अंभारे यांनी केले. भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर असेल, त्यासाठी निर्धार केल्याचे दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले.