कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध, पण……

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

संग्रहित छायाचित्र

कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. हे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसून अपक्ष म्हणून उभा राहिले होते. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर चार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातून रा. पिंपळवाडी ता. पाटोदा, जि. बीड येथील रोहित राजेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज प्रतिज्ञापूर्ण अपूर्ण असल्याने बाद ठरवण्यात आला आहे. एकसारख्या नावाचा गैरफायदा उठवत डमी उमेदवार उभा करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यामुळे फसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

कर्जत-जामखेड या विधानसभा मतदार संघाातून शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासारखेच नाव असलेल्या दुसऱ्या उमेदवारानेही अर्ज केला. निवडणुकीत मतदारांची गल्लत करण्यासाठी प्रमुख उमेदवारासारखे नाव असलेल्या व्यक्तींना मुद्दाम उभे करण्याची जुनीच पद्धत आहे. तसाच प्रकार या मतदारसंघात झाला. मात्र, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याच्या मुद्द्यावर बीडच्या रोहित पवार यांचा अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे एकसारख्या नावाचे दोन उमेदवार रिंगणात आणण्याचा प्रयत्न फसला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला आहे. बीडच्या रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याच्या प्रकरणामुळे रोहित पवार यांचाच अर्ज बाद झाला, अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, तालुका- पाटोदा, जि- बीड ), शेख युनुस दगडू, रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत.

दरम्यान, याच मतदारसंघात राम रंगनाथ शिंदे या अपक्ष उमेदवाराचा अर्ज असून, तो मात्र मंजूर झाला आहे. भाजपतर्फे पालकमंत्री प्रा. राम शिंदे येथून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या नावाप्रमाणे नाव असलेला हा दुसरा उमेदवार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharshtra election 2019 dummy candidate rohit pawars invalid from karjat constituency in nagar nck

Next Story
पहिल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकतर्फी यश
ताज्या बातम्या