कर्जत—जामखेड मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेनवडी येथील शिवाजी गदादे व पुण्याच्या नगरसेविका प्रिया गदादे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्याच्या प्रेमाखातर आगळा वेगळा ‘विजयरथ’ दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी हा रथ वापरला जात आहे. या रथाची वैशिष्टय़े म्हणजे या रथावर चहू बाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या समोरील छतावर घडय़ाळ टांगले आहे. तर दर्शनी बाजूस राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांचे झेंडे लावण्यात आले असून या रथामध्ये विठ्ठलाचे रूप धारण केलेला युवक उभा आहे. पवार यांच्या विजयात या विजयरथाचाही वाटा असेल असा विश्वास यावेळी शिवाजी गदादे यांनी व्यक्त केला.

कर्जत—जामखेडच नव्हे तर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आहेत. कर्जत जामखेडचा विचार केला तर अनेकांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी वेगवेगळे ‘पण’ केले आहेत. रोहित पवार आमदार झाल्यानंतरच अंगात शर्ट चढवेन, पायात चप्पल घालेन,दाढी करेन,काहींनी तर रोहित पवार आमदार होत नाहीत तोपर्यंत विवाह करणार नाही असे म्हटले आहे. रोहित हे शरद पवारांचे वारसदार मानले जातात. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रथात विठ्ठल उभा!
गेली तीस वर्षे वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. राज्यातील जनता हिटलरशाहीपासून वाचावी,आश्वासने व दिशाभूल करून जनतेची फसवणूक होत आहे. विकासाबाबत हे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे कर्जत—जामखेडच्या जनतेला बुद्धी द्यावी म्हणून हा विठ्ठल कमरेवर हात ठेवून आमच्या विजय रथात उभा आहे असे रोहित पवार यांनी सांगितले.