रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बुधवारी दिवसभर वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे महावितरणचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील सुमारे २ लाख २९ हजार वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित झाला.
रत्नागिरी जिल्ह्य़ात चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा इत्यादी तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा जास्त फटका बसला. जिल्ह्य़ातील महावितरणचे लघुदाबाचे २१५ व उच्चदाबाचे ३८ खांब या वादळामुळे मोडले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उच्चदाबाचे ४३ व लघुदाबाच्या ७८ खांबांचे नुकसान झाले. चिपळूण व गुहागर तालुक्यात हे नुकसान सर्वाधिक आहे. चिपळूण शहर व तालुक्यात मिळून १२० लघुदाबाचे व २१ उच्चदाबाचे तर गुहागर तालुक्यात लघुदाबाचे २० खांब उद्ध्वस्त झाले.
वादळाच्या या रौद्र स्वरूपामुळे जिल्ह्य़ातील सुमारे २ लाख २९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. कारण एकूण ७९ फिडरमार्फत होणाऱ्या वीजपुरवठय़ावर परिणाम झाला होता. त्यापैकी ७५ टक्के पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणचे कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता सिद्धार्थ नागटिळक आणि रत्नागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे दुरुस्तीच्या कामावर व वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर देखरेख ठेवत आहेत.