निवडून येण्याचा नवा ‘आदर्श’ ठेवत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काठावरच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत निवडून आलेले राजीव सातव वगळता मराठवाडय़ात ६ जागांवर महायुतीने विजय मिळविला. भाजपची एक जागा वाढली, तर राष्ट्रवादीचा अक्षरश: धुव्वा उडाला. राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, विजय भांबळे आणि सुरेश धस या तिन्ही उमेदवार पराभूत झाले. बीड व जालना मतदारसंघांवरील पकड कायम ठेवत गोपीनाथ मुंडे आणि रावसाहेब दानवे यांनी दणदणीत विजय मिळविला. यात लातूरच्या जागेची भर पडली. भाजपचे ३, तर शिवसेनेचेही ३ उमेदवार निवडून आले.
मोदी लाट एवढी जबरदस्त होती की, उमेदवारांनाही एवढय़ा मतांनी निवडून येऊ, अशी अपेक्षा नव्हती. उस्मानाबादेत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात सेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी २ लाख ३३ हजार ७३५ मतांची आघाडी घेतली. गेल्या वेळी प्रा. गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला होता. जालना मतदारसंघात २ लाख ६ हजार ८१८ मतांची आघाडी घेत भाजपच्या दानवे यांनी काँग्रेसच्या नवख्या विलास औताडे यांना पराभवाची धूळ चारली. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या औताडेंना वडील जिल्हाध्यक्ष असल्याने उमेदवारी मिळाली होती.
अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांना काँग्रेसचे सातव यांनी पराभूत केले. या मतदारसंघात मोदी लाटेतही जात पद्धतशीर जोपासली गेली, तरीही सातव निवडून आले. परभणीत शिवसेनेने पुन्हा बाजी मारली. येथे संजय जाधव मोठय़ा फरकाने विजयी झाले. औरंगाबादेत चौथ्यांदा निवडून येत चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस उमेदवाराला पराभूत केले. विलासराव देशमुखांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांचा कस लागला होता. मात्र, कल्पना गिरी हत्याकांड स्वत: मोदींनीच उचलून धरल्यानंतर लातूर मतदारसंघात जी हवा तयार झाली, त्यावर डॉ. सुनील गायकवाड २ लाख ५३ हजार ३५५ मतांनी विजयाची मोहोर उमटविली.
मराठवाडय़ात काँग्रेसचे १९ आमदार आहेत. सर्वाधिक आमदार असणाऱ्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण निवडून येतील, असे मानले जात होते. उमरखेड हा विदर्भातील मतदारसंघही हिंगोलीस जोडलेला असल्याने तेथील काँग्रेसच्या आमदारांचेही सहकार्य सातव यांना मिळाले. राष्ट्रवादीचे १४ आमदार आहेत. विधान परिषदेचे सदस्यही आहेत. मात्र, या सगळ्यांनी केलेला प्रचार मतदारांना भावला नाही. शिवसेनेचे ९ आमदार आहेत. मात्र, ते मोदी लाटेच्या पालखीचे भोईच राहिले.
प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला पद्धतशीर बाजूला ठेवले. विशेषत: उस्मानाबाद, परभणी जिल्ह्य़ांमध्ये  आघाडीतील मतभेद कायम असल्याचे दिसून आले. तशा तक्रारीही पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आल्या. राष्ट्रवादीविरुद्ध मराठवाडय़ात रोष होता. अशोक चव्हाण व गोपीनाथ मुंडे हेच मराठवाडय़ाचे नेतृत्व करू शकतात, असाही संदेश या निवडणुकीतून घेतला जात आहे.