मंत्री गुलाबराव पाटील अर्थमंत्र्यांबाबत जे बोलले ते बरोबरच असून त्याचे मी समर्थन करतो. केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचे सरकार असतानाही अर्थ खात्याने मनमानी कारभार केला, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता नोंदवले. याशिवाय राज्यातील या पाच वर्षांतल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असतानाच उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की, आपण स्वतः आठ पंचवार्षिक पाहिलेल्या आहेत. दुर्दैवाने सध्याची पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट ठरली. राज्याच्या हिताचा विचार न करता सत्तेच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले. राजकारणाचा घसरलेला हा स्तर मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या राज्यासाठी भूषणावह नाही. अर्थ खात्याचे काम पाचही वर्षांत कधीही न्यायाचे झाले नाही. वास्तविक तुमच्याकडे अर्थ खाते म्हणजे सगळे तुमचेच असे समजण्याचे कारण नसते. सर्व राज्याला समान न्याय या तत्त्वाने कारभार न करता फक्त आपल्या मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला. त्यांच्याच विभागात विकास कामे करण्याचा धडाका लावला. मात्र या विकास कामांतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने हा पैसा गेला कुठे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. निधी वाटपाबाबत पाचही वर्षे भेदभाव केला गेला. आघाडी सरकार असताना वेळोवेळी आपण त्याची तक्रार योग्य ठिकाणी केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या खात्यात इतके अयोग्य निर्णय घेतले गेले असा गंभीर आरोपही थोरात यांनी केला.

हेही वाचा – Swami Govind Dev Giri: ‘छत्रपती शिवरायांनी त्याकाळी ईडीप्रमाणे सक्तीची वसुली केली’, स्वामी गोविंददेव गिरी यांचे विधान

भाजपामुळेच फडणवीस चक्रव्युहात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्रव्युहात फसल्याबाबतच्या विधानाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ती त्यांच्याच पक्षाने आणली आहे. राज्यात नको ते उद्योग करण्याची जबाबदारी भाजपाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर टाकली. पण शेवटी फडणवीसच अडचणीत आले हे आजची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचे त्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेलाही आवडलेले नाही हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा – पुणे-सातारा महामार्गावर उड्डाणपुलावरून दुचाकी कोसळून पती ठार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महायुतीत मोठे मतभेद..

महायुतीतील मतभेदावर बोट ठेवताना थोरात म्हणाले की, एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना पद टिकवायचे आहे. एक मुख्यमंत्री राहिले होते, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. एकाची काहीही करून मुख्यमंत्री होण्याची धडपड चालू आहे. या तिघांचाही आपला स्वतःचा वेगवेगळा अजेंडा आहे. हा अजेंडा जनतेच्या हितासाठी नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहे. त्यामुळे महायुती एकसंध राहिली नसून त्यांच्यात ठिकठिकाणी मोठे मतभेद झालेले आपल्यास दिसतात. मोठ्या प्रमाणावर योजना राबवून निधी खर्च केलेला दाखवला जातो, मात्र कोणतेही काम दर्जेदार होत नाही. राज्य बरबाद करण्याचे काम महायुतीने केल्याची घाणाघाती टीका आमदार थोरात यांनी केली.