विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून सत्ताधारी आणि विरोधक या अधिवेशनात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आत्तापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असणारं आक्रमक वातावरण आता सत्ताधारी आमदारांमध्येच आपापसात दिसू लागलं आहे. त्याचाच प्रत्यय आज विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे एक आमदार थेट मंत्र्यांनाच भिडल्यानंतर पाहायला मिळाला. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात लॉबीमध्येच बाचाबाची झाल्यामुळे हा अधिवेशनात चर्चेचा विषय ठरला.

नेमकं काय घडलं?

सभागृहात विरोधी पक्षांच्या आमदारांवर आक्रमकपणे व्यक्त होणारे सत्ताधारी पक्षाचे आमदारच एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचं आज विधानसभेच्या बाहेर दिसून आलं. आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात झालेल्या बाचाबाचीची चर्चा आज विधानभवनात पाहायला मिळाली. यासंदर्भात शिंदे गटाच्या इतर आमदारांना विचारणा केली असता विकासकामासंदर्भात झालेली की चढ्या आवाजातली चर्चा होती, अशी सारवासारव प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना केली. मात्र, महेंद्र थोरवे यांनी स्वत: टीव्ही ९ शी बोलताना यासंदर्भात भूमिका स्पष्ट करताना बाचाबाची झाल्याचं मान्य केलं.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..

काय म्हणाले महेंद्र थोरवे?

महेंद्र थोरवेंनी बाचाबाची झाल्याच्या मुद्द्याला दुजोरा देताना दादा भुसेंवर आगपाखड केली आहे. “ते मला म्हणाले तुम्ही अशा पद्धतीने मला प्रश्न विचारू शकत नाहीत. मी आमदार आहे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही तर कुणाला विचारणार? मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं तर एका क्षणात त्यांना फोन करून सांगितलं की दादा तुम्ही हे काम बोर्ड मीटिंगमध्ये घ्या. पण तरीही ते काम त्यांनी घेतलं नाही. म्हणून आमची थोडी बाचाबाची झाली”, असं महेंद्र थोरवे म्हणाले.

“त्यांनी जाणीवपूर्वक हे काम का केलं नाही ते मला माहिती नाही. पण दादा भुसे प्रत्येक आमदाराच्या बाबतीत नकारात्मक पद्धतीने विचार करत असतात. असं त्यांनी वागू नये”, अशा शब्दांत महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेंवर टीका केली.

“आधीच्या खात्याचंही काम केलं नाही”

दरम्यान, दादा भुसेंकडे आधी असलेल्या खात्याचं त्यांना सांगितलेलं एक कामही त्यांनी केलं नसल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला. “ते कर्जतमध्ये आले तेव्हा तिथल्या विकासकामांचं लोकार्पण त्यांनी केलं होतं. मी दादा भुसेंना त्यांच्या सध्याच्या खात्याबाबत सांगितलेलं हे पहिलंच काम होतं. त्यांच्या याआधीच्या खात्याचंही एक काम मी तेव्हा सांगितलं होतं. तेही त्यांनी केलं नव्हतं. आता हे कामही त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे माझी त्यांच्याशी बाचाबाची झाली”, असं महेंद्र थोरवे म्हणाले.