शासनाऐवजी नक्षलवाद्यांच्या धोरणाचा प्रसार करणारा गडचिरोलीतील ‘प्राइम मिनिस्टर फेलो’ महेश राऊतने नक्षलवाद्यांच्या वतीने पत्रके काढण्याचा उद्योगसुद्धा केल्याची माहिती आता तपासातून समोर आली आहे. राऊत व त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी अद्याप अटक केली नसली तरी अहेरी सोडून जाऊ नये, असे या दोघांना बजावण्यात आल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली.
महेश राऊत व त्याची मैत्रीण हर्षांली पोतदार या दोघांची काल आलापल्लीच्या प्राणहिता मुख्यालयात सुमारे ४ तास कसून चौकशी करण्यात आली. या दोघांवर शनिवारी रात्री एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालच्या चौकशीतून राऊत व हर्षांलीचे अनेक नवे उद्योग समोर आले आहेत. राऊतने बी. डी. शर्मा यांनी स्थापन केलेल्या भारत जनआंदोलनाच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील काही गावांत बैठकासुद्धा घेतल्या होत्या. ही बाब नक्षलवाद्यांना ठाऊक झाल्यानंतर त्यांनी या दोघांना चांगलेच फटकारले होते. यानंतर मात्र या दोघांनी भारत जनआंदोलनाचे काम करणे बंद केले. झालेल्या जिंदाल समूहाच्या प्रस्तावित लोहखाणीसाठी दीड महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या जनसुनावणीच्या काळात नक्षलवाद्यांनी या खाणीला विरोध करणारी अनेक पत्रके काढली होती. यापैकी काही पत्रके राऊत व त्याच्या मैत्रिणीनेच तयार केली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याच काळात राऊतने भारत जनआंदोलनाच्या नावावरसुद्धा काही पत्रके काढली होती. या दोन्ही पत्रकांतील भाषा नक्षलवादी वापरतात तशीच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राऊत या भागात सक्रिय असलेल्या नक्षल समर्थकांच्या कायम संपर्कात असायचा, त्याला या समर्थकांनी नक्षलवाद्यांचे प्रचार साहित्य वेळोवेळी उपलब्ध करून दिल्याची बाब तपासात आढळून आली आहे. पूर्णपणे नक्षलवादी विचारसरणीने भारावलेल्या महेश राऊतची फेलो म्हणून निवड करण्यात यावी, अशी शिफारस गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी केली होती. फेलोची शिफारस करताना प्रचंड काळजी घ्यावी, असे ग्रामीण विकास मंत्रालयाचे निर्देश असतानासुद्धा कृष्णा यांनी राऊतची पाश्र्वभूमी न तपासताच त्याची शिफारस कशी केली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राऊत हा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून या भागात काम करीत असल्याने त्याची शिफारस केली, असे कृष्णा यांचे म्हणणे आहे.
फेलो म्हणून देशभरातून निवडण्यात आलेल्या ८७ तरुणांना मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्थेने प्रशिक्षण दिले होते. राऊत प्रकरणामुळे ही संस्थासुद्धा आता अडचणीत आली आहे. या संस्थेच्या उपसंचालक नीला डबीर यांच्याशी आज संपर्क साधला असता संस्थेकडे केवळ प्रशिक्षण देण्याचे काम होते. तरुणांची निवड करण्याचे काम नव्हते असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणात अडकलेल्या राऊतचा बचाव करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून हालचाली सुरू झाल्या आहेत. राऊतला नाहक या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असे संस्थेच्या वतीने ग्रामीण विकास मंत्रालयाला कळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. डबीर यांनी मात्र राऊतला ओळखत असले तरी अशा कोणत्याही हालचालीविषयी कल्पना नाही, असे आज स्पष्ट केले. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोप झेलणाऱ्या महेश राऊतने आज जिल्हा प्रशासनाला एक लेखी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात या प्रकरणात आपल्याला फसवण्यात आले आहे, असा दावा राऊतने केला आहे.
या स्पष्टीकरणाचा आधार घेत प्रशासनातर्फे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाला या प्रकरणाचा अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती आज एका अधिकाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh raut write letter on behalf of naxel to spread naxel policy
First published on: 25-06-2013 at 02:45 IST