औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दाटले असताना आणि गेल्या काही महिन्यांपासून वाहन उद्योगाकडून उत्पादन प्रक्रिया वारंवार बंद ठेवली जात असताना सोमवारी किमान वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी नाशिकमधील महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कारखान्यातील १,८२९ हंगामी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अनुसरला. या कामगारांचा उत्पादन प्रक्रियेशी कोणताही संबंध नसल्याने दैनंदिन उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. कामगार उपायुक्तांनी मध्यस्थी करूनही सायंकाळी उशिरापर्यंत हंगामी कामगारांनी आंदोलन मागे घेतले नाही.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कारखान्यात ४८ कंत्राटदारांच्या माध्यमातून १८२९ कामगार कार्यरत आहेत. त्यांच्यावर स्वच्छता, बागकाम व तत्सम स्वरूपाच्या कामांची जबाबदारी आहे. सकाळी आठच्या सुमारास हंगामी कामगार कामावर बहिष्कार टाकून प्रवेशद्वारासमोर एकत्र झाले. किमान वेतन वाढवून मिळावे, खाद्यभत्ता मिळावा आदी मागण्या त्यांनी पुढे केल्या. याची माहिती समजल्यानंतर कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी कारखान्यात भेट देऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. हंगामी कामगारांचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक होऊन किमान वेतनाविषयी कामगारांचे गैरसमज दूर करण्यात आले. त्या वेळी कामगारांनी कामावर लगेच हजर होण्यास सहमती दर्शविली. परंतु आंदोलनस्थळी कामगार प्रतिनिधी गेल्यावर त्यांच्यात मतभेद झाले. काही जण कामावर येण्यास राजी होते, तर काहींचा विरोध होता. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कामगार उपायुक्त विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु हंगामी कामगार कामावर जाण्यास तयार झाले नाहीत, असे जाधव यांनी सांगितले. आंदोलकांचा उत्पादन विभागाशी संबंध नसल्याने कारखान्यातील दैनंदिन उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे महिंद्राच्या (कर्मचारी संबंध) विभागाचे महाव्यवस्थापक ए. के. गोडबोले यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये ‘महिंद्रा’त हंगामी कामगारांचे काम बंद
औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दाटले असताना आणि गेल्या काही महिन्यांपासून वाहन उद्योगाकडून उत्पादन प्रक्रिया वारंवार बंद ठेवली जात असताना सोमवारी किमान वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी
First published on: 26-11-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra contract basied workers makes strick in nashik