श्रीरामपूर : दारू पिऊन भांडण करणाऱ्या सख्ख्या भावाचा काल भाऊबिजेच्या दिवशी खून करण्यात आला. भोकर(ता.श्रीरामपूर) शिवारातील काळेवस्ती येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी रवींद्र उर्फ पप्पू नवले याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुळचे सुभाषवाडी (बेलापूर, ता. श्रीरामपूर) येथील रहिवाशी असलेले प्रदीप बाबासाहेब नवले व रवींद्र उर्फ पप्पू नवले हे  भोकर येथील काळेवस्ती येथे मामाकडे रहातात. ते शेतमजुरी करतात. दोघेही वेगवेगळे रहातात. आज सकाळी काळेवस्ती परिसरात प्रदीप नवले याचा मृतदेह गवतात आढळून आला. डोक्यात काहीतरी मारून त्याचा खून केल्याचे निदर्शनास आले. पोलिस पाटील बाबासाहेब साळे यांनी याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली.

पोलिसांनी प्रदीप नवले याच्या खून प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी या प्रकरणी तपास सुरु केला असता प्रदीपचा खून हा त्याचा सख्खा भाऊ  रवींद्र उर्फ पप्पू नवले याने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रवींद्रला अटक केली. प्रदीप याने एक वषापूर्वी आरोपी रवींद्र याच्या घरी जाऊन शिवीगाळ केली होती. हा वाद मिटला होता. मात्र काल भाऊबिजेच्या दिवशी प्रदीप याने दारुच्या नशेत रवींद्रला शिवीगाळ केली. प्रदीपची पत्नी स्वाती ही भाऊबिजेनिमित्त माहेरी गेली होती. रात्री रवींद्र याने प्रदीप याच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारुन खून केला. नंतर मृतदेह गवतात लपवून ठेवला. मयत प्रदीपची पत्नी स्वाती हिने तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे करीत आहेत.