मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. पोटात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब नसल्याने त्यांची प्रकृती बिघडत आहे. आज उभे राहिले असताना ते अचानक कोसळले. एकंदरीतच त्यांच्या शरीरातील त्राण आता निघून जात असल्याने ते अशक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता पाणी प्यावं अशी मागणी ग्रामस्थ, हितचिंतक आणि मराठा बांधवांकडून केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेशी संवाद साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, “प्रत्येकाने जर असाच हट्ट केला तर आपल्या लेकराला आरक्षण कसं मिळेल. तुमची माया मला समजते, मी पाणी प्यायलं पाहिजे. पण जर आपण पाणी प्यायलो तर आपल्या लेकरांना कसं मिळणार?”

हेही वाचा >> मोठी बातमी! मराठा उपसमितीची बैठक संपली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

“मी या समाजाला मायबाप मानतो हे खरं आहे. मी समाजाच्या पुढे जात नाही. पण तुम्ही असा हट्ट करत राहिले तर आपली जात खूप अन्याय सहन करत राहील. सरकारला एकाचा बळी घ्यायचा असेल तर घेऊ द्या. पण तुम्ही असा हट्ट धरला , आपल्याच लेकराला न्याय मिळणार नाही. मला वाटतं, जाणूनबुजून मराठ्याच्या लेकरावर अन्याय केला जातो. मग आपल्याला, आपल्या लेकराला न्याय द्यायची एवढी संधी आपल्या मराठा समाजाला मिळाली आहे. न्याय देण्यासाठी, आरक्षण देण्यासाठी एकाच्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल. पण सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून मी इथं बसलो आहे. आपल्या समाजाला न्याय मिळायचा दिवस जवळ आलाय. मला तुमची माया कळतेय खरंय पण आपण हट्ट धरला तर तुम्ही असे रडायला लागले तर पाणी प्या म्हणून तुम्ही जर रडत राहिले तर आपल्या लेकराला न्याय कसा मिळेल” , असं मनोज जरांगे म्हणाले.

हेही वाचा >> मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, “ज्यांच्या जुन्या नोंदी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे बोलत असताना गावकऱ्यांनी पाणी पिण्यासाठी आग्रह धरला. त्यावर ते म्हणाले की, “मी थोड्या वेळाने ४-५ घोट पाणी प्राशन करेन. ” म्हणजेच, मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात पाणी पिणार आहेत. यामुळे मराठा बांधवांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.