मराठा आरक्षण : “सरकारने जर दखल घेतली नाही, तर परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील”

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा बीड येथील मोर्चाद्वारे महाविकासआघाडी सरकारला इशारा!

संग्रहीत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड येथे शिवसंग्राम  संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी विनायक मेटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारला इशारा दिला. “सरकारने जर दखल घेतली नाही, तर याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील.” असं मेटे यांनी सांगितलं आहे.

“मोर्चाला झालेली गर्दी पाहता, तरूणांमध्ये किती रोष आहे हे दिसत आहे. मात्र हा रोष देखील सरकारला दिसत नाही. त्यामुळे हे सर्वजण संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या सरकारने जर दखल घेतली नाही, तर याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील. मी आता जसं आवाहन केलं तसंच आवाहन सुरूवातीपासून करतो आहे. हा मूक मोर्चा नाही घोषणा देत सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा आहे. अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा आहे.” असं शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे.

“मराठा आरक्षणासाठी भाजपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार; आंदोलनात एक नागरिक म्हणून सहभागी होणार”

या मोर्चासाठी बीड येथील शिवाजी चौकात मोठ्यासंख्येने मराठा समाज बांधव जमले होते. तसेच, यावेळी कडेकोट पोलीस बंदोस्त देखील तैनात करण्यात आलेला होता. मोर्चाप्रसंगी करोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची सूचना विनायक मेटे यांनी अगोदरच दिली होती. त्यानंतर आज बीडमधून या मोर्चाला सुरूवात झाली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समजातील विविध नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून हा मोर्चा निघून, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार होता. या अगोदरचे मोर्चे हे मूक मोर्चे होते, परंतु या मोर्चात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करणायात आल्याचे दिसून आले.

मराठा समाजाला न्याय देता येत नसेल तर ठाकरे आणि चव्हाण यांनी सत्ता सोडावी  –

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तो रस्त्यावर येऊन उद्रेक होऊ नये यासाठीच राज्य सरकारने करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावाखाली ३१ मे पर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता ५ जून रोजी कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याचं शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मोर्चाची घोषणा करताना सांगितलं होतं. लिंगायत, मुस्लीम, धनगर या समाजालाही बरोबर घेऊन सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध हा मोर्चा असेल. मराठा समाजाला न्याय देता येत नसेल तर ठाकरे आणि चव्हाण यांनी सत्ता सोडावी, अशी टीकाही त्यांनी तेव्हा केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maratha reservation if government does not take notice results will be seen across the state vinayak mete