मराठा आरक्षणाच्या प्रकरणी आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापूरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरु होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

आणखी वाचा- मराठा आरक्षण: “आयोगाच्या अहवालापूर्वीच पंतप्रधानांकडे मागणी करणं ही केवळ धूळफेक”

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

संभाजीराजेंनी राजकारण्यांवरही घणाघाती टीका केली आहे. आपली व्होट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाही. पण मला ती काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे.

मी समाजाची दिशाभूल करणार नाही. आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation mp sambhajiraje mute protest on 16 june vsk
First published on: 10-06-2021 at 14:05 IST