( सरस्वती रिसबूड)
‘१ मे १९६० या शुभदिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा पं. नेहरू यांच्या उपस्थितीत प्रतापगडावरून झाली. त्याच दिवशीच्या आपल्या मराठा दैनिकाच्या अग्रलेखात आचार्य अत्रे लिहितात, ‘आजच्या शिवजयंतीच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य जन्माला यावे हा योग आम्ही जितका शुभ मानतो तितकाच सूचक समजतो.’ या महाराष्ट्र राज्याच्या रूपाने शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आले आहेत असे वाटते. बेंगळुरूच्या महाराष्ट्र मंडळात असाच योग पुन्हा एकदा आला. ‘शिवरायाचे आठवावे रूप’ हे सूत्र धरून विजयरावजी देशमुख यांनी शिवरायांच्या चरित्रावरील राजकारणातील, पराक्रमातील, स्वभावातील विविध पैलूंवर आपल्या वाणीतून प्रकाश टाकला. ते भाषण नव्हते, प्रत्यक्ष सरस्वतीदेवीच त्यांच्या मुखांतून त्यांचे विचार व्यक्त करते आहे असा भास होत होता.
महाराष्ट्राच्या जीवनात घडून गेलेल्या, रोहिडेश्वराच्या देवळात मावळे सवंगडय़ांसोबत १२-१५ वर्षांच्या शिवाजीने ज्या आणाभाका घेतल्या तेव्हापासून ते कुशल राजकारणी, स्मितमुखी, शिवभक्त, दांडगा आत्मविश्वास बाळगणाऱ्या शिवाजीचे जिवंत चित्रण सभागृहात केले. सभागृहाच्या भिंतीसुद्धा सद्गदित होऊन ऐकत होत्या. प्रेक्षक तर भान हरपून शिवरायांच्या काळातच वावरत होते. कडकडून टाळ्या वाजवण्याचे भान काही क्षणानंतर आले.
अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, आग्य्राहून सुटका, सुरतेची लूट या घटना अद्भुत, रोमांचकारी आहेतच पण या थोर कार्यामागे महाराजांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली, प्रोत्साहन दिले त्या सर्वाचे स्मरण करणे हे कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्याची घोषणा झाली त्यामागे ज्यांनी समर्पण केले आहे त्या सर्व सानथोरांना वंदन करून व्याख्यानाची सांगता झाली.

राजधानीत महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी
शूर योद्धा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार, गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही या वेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
अंजू निमसरकर-कांबळे, एल. बी. शिंदे यांनी महाराणा प्रताप यांच्या योगदानाबाबत माहितीपर भाषणे दिली. या वेळी कार्यालयात आलेल्या अभ्यागतांसह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

‘अखिल भारतीय साहित्य स्पर्धा’ गौरव पुरस्कार
मराठी वाङ्मय परिषद बडोदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय साहित्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व साहित्याचा त्या त्या वर्षांच्या परीक्षणासाठी विचार केला जातो. जे साहित्य वरील नमूद केलेल्या अवधीत येत असेल ते १० जानेवारी (पुढील वर्षीचे) पर्यंत प्रत्यक्ष वा पोस्टाने पुढील पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. त्यासोबत त्या त्या स्पर्धाचे प्रवेशशुल्कही पाठवावे.
साहित्य विभाग- ‘ख’
कथा, कविता, ललित लेख निबंध प्रवेश शुल्क प्रत्येकी रु. ५०/- फक्त.
साहित्य विभाग- ‘ग’
कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेखसंग्रह, निबंधसंग्रह, कादंबरी आणि नाटक. प्रवेश शुल्क रु. १००/- प्रत्येकी.
साहित्य विभाग- ‘घ’
आत्मकथा, आत्मचरित्र, विनोदी साहित्य, अनुवादित साहित्य. प्रवेश शुल्क रु. १००/- प्रत्येकी.
विशेष सूचना- वरीलप्रमाणे प्रवेश शुल्क बँक ऑफ महाराष्ट्र, रावपुरा शाखा बडोदे.
बचत खाते नं. ६०१२८३१०८०७
IFSC Code MAHB 0000105
या खाते जमा करून त्याचा तपशील कळवावा.
साहित्य पाठविण्याचा पत्ता- डॉ. धनंजय वसंतराव मुजुमदार, ‘सुयोग’ ४०३ सी टॉवर, लक्ष एव्हेन्यू, सिद्धार्थनगर जवळ, न्यू कारेलीबाग, खोडियार नगर ४ रस्ता, बडोदे ३९००२२. संपर्क- मो. ०९०८०९१२२६ (घर) ०२६५ २५७५२२५
http://www.vangmayparishadbaroda.org
परिषदेमार्फत स्थानिक धार्मिक निबंध स्पर्धा आणि विज्ञान निबंध स्पर्धाचेसुद्धा आयोजन केलेले आहे.
धार्मिक निबंध स्पर्धेसाठी विषय- ‘धर्म आणि आतंकवाद’
विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विषय- ‘२०५० सालचा आपला भारत’

– रेखा गणेश दिघे
rekhagdighe@gmail.com