Virar Auto Driver Slapped over Marathi Language Row: मराठी भाषेचा स्थानिकांकडून होणारा आग्रह आणि काही अमराठी लोकांकडून त्यास होणारा विरोध, यामुळे अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती उद्भवलेली पाहायला मिळत आहे. मीरा रोडचे प्रकरण देशपातळीवर गाजल्यानंतर आता विरारमध्येही याची पुनरावृत्ती झाली आहे. ‘हिंदू बोलूंगा, भोजपूरी बोलूंगा, पर मराठी नही बोलूंगा’, असे मुजोरपणे सांगणाऱ्या एका रिक्षा चालकाचा व्हिडीओ मागच्या आठवड्यात समोर आला होता. आता या रिक्षाचालकाला चोप देण्यात आल्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे चोप देणाऱ्यांमध्ये मनसेसह शिवसेनेच्या (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले होते. ५ जुलै रोजी वरळी येथे दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. आता तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मराठीचा मुद्दा आक्रमकपणे रेटताना दिसत आहेत.
विरारच्या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील झाशी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनेच सदर प्रकरण समोर आणले होते. ओव्हरटेक करण्यावरून रिक्षाचालक आणि सदर व्यक्तीमध्ये वाद झाला होता. झाशीचा व्यक्ती अस्खलित मराठीत बोलत असताना रिक्षा चालकाने मात्र त्याच्याशी हिंदीत बोलण्यासाठी वाद घातला. यानंतर झाशीच्या व्यक्तीला इतर रिक्षा चालकांनी मिळून धक्काबुक्की केली आणि त्याचा फोन रस्त्यावर फेकला.
यावेळी सदर रिक्षा चालकाने ‘मै मराठी मे बात नही करूंगा, तुझे जो करना है कर’, असे मुजोरपणे म्हटले होते. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आणि शिवेसनेच्या (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रिक्षा चालकाला विरार रेल्वे स्थानकाजवळ गाठले आणि त्याला चोप देत माफी मागण्यास भाग पाडले.
यावेळी रिक्षा चालकाला त्या झाशीच्या व्यक्तीची माफी मागण्यास सांगितले. पोलिसांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. सदर व्हायरल व्हिडीओ आम्ही पाहिला, मात्र याबद्दल कुणीही तक्रार दिलेली नाही, असे ते म्हणाले.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सदर रिक्षा चालक हा स्थलांतरित मजूर आहे. त्याने मराठी भाषा आणि काही नेत्यांचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख केला होता. यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख उदय जाधव यांनी रिक्षा चालकाला गाठून त्याला चोप दिला.
उदय जाधव म्हणाले की, जर मराठी भाषा आणि मराठी लोकांचा कुणी अवमान करत असेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल. आम्ही गप्प बसणार नाही.