scorecardresearch

न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर अधिक व्हावा – न्या. राजंदेकर

न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी केले.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी केले. सांगली जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करीत होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निवृत्त प्राध्यापक बाबुराव गुरव, जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र मलाबादे, जिल्हा व सत्र न्या. दत्तात्रय सातवळेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रवीण नरडेले, जिल्हा सरकारी वकील अरिवद देशमुख व सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष संदीप लवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राजंदेकर म्हणाले, जिल्हा न्यायालयात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर होतो. मराठी भाषा ही पक्षकारांना समजण्यासाठी अत्यंत सोपी जाते. न्यायालयीन कामकाजात सर्वानी जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग करावा. न्याय निर्णय देताना मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा असेही ते म्हणाले. या वेळी बोलताना प्रा. गुरव म्हणाले न्यायदानात प्रत्येक शब्दाला खूप अर्थ असतो. न्यायदान करताना ऱ्हस्व, दीर्घ, पूर्णविराम यांचा अभ्यास झाला पाहिजे. आपले विचार मराठी भाषेतच विकसित होतात, त्यामुळे मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त तंत्रशुद्ध पद्धतीने झाला पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरवातीला तदर्थ जिल्हा न्या. पोतदार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरकारी वकील अरिवद देशमुख यांनी तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. प्रवीण नरडेले यांनी केले तर सूत्रसंचालन न्या. अंबिका कुलकर्णी यांनी केले. या वेळी सांगली जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी, सांगली वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi use language court proceedings ysh

ताज्या बातम्या