अलिबाग – माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणूकीचे तसेच लुटीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे माथेरानची बदनामी होत आहे. या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ही पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा अन्यथा १८ मार्चपासून माथेरान बंद करू, असा इशारा माथेरानकरांनी दिला आहे.
ब्रिटीश काळापासून माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आणि आदर्श पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात, येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होण्याचे, त्यांना लूटण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. समाज माध्यमांवर येणाऱ्या पर्यटकांकडून याबाबचे अनुभव प्रसारित केले जात आहेत. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला ओहोटी लागण्यास सुरूवात झाली आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करून पाऊले उचलावीत अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे.

माथेरानला परमिट टॅक्सीने येणाऱ्या पर्यटकांना घाटाच्या पायथ्याशी अडवून नेरळ माथेरान दरम्यान चालणाऱ्या टॅक्सी संघटनांकडून ५०० रुपयांचा टोल आकारला जातो. ही रक्कम देण्यास नकार दिल्यास पर्यटकांना खाली उतरण्यास भाग पाडले जाते. नंतर स्थानिक टॅक्सीने या पर्यटकांना वर माथेरानला जाण्यासाठी भाग पाडले जाते. बेकायदेशीरपणे होणारी ही वसूली तातडीने थांबवावी.

दस्तुरी नाका येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्वचालक, कुली आणि एजंट गराडा घातला जातो. पर्यटकांना खोटी माहिती देऊन त्यांना दिशाभूल केली जाते. चुकीची माहिती देऊन फसवणूक करणे अवाजवी दर आकारणी करणे असे प्रकार घडतात. पार्कींग मध्ये अधिकृत पार्कीग शुल्का व्यतिरीक्त अतिरिक्त शुल्क आकारले जाते. भाडे नाकारणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची हवा काढणे, त्यांच्या गाड्यांवर रेघोट्या ओढणे सारखे प्रकारही घडतात. या सर्व प्रकारांमुळे माथेरानची बदनामी होत आहे. माथेरानच्या पर्यटनावर त्याचे विपरित परिणाम होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी यात हस्तक्षेप करून अशा अनुचित प्रकारांना प्रतिबंध करावा अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दस्तुरी फाटा येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करावी, तिथे पर्यटन सुविधा केंद्र सुरु करावे, पार्कींग झोन मध्ये घोडेवाले, एजंट कुली यांना प्रवेश बंदी करण्यात यावी, सिसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरु करण्यात यावेत. माथेरानच्या घाटाच्या पायथ्याशी असलेली बेकायदेशीर वसूली थांबविण्यात यावी. अश्वचालक, कुली, रिक्षाचालक यांचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्यात यावे, बेकायदेशीर पथविक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी समितीने माथेरानच्या अधिक्षकांकडे केली आहे. यावर तातडीने पाऊले उचलली गेली नाहीत तर १८ मार्च पासून माथेरान बंद करण्याचा इशाराही दिला आहे.
माथेरानला येणाऱ्या पर्यटकांकडून अश्वचालक आणि टॅक्सीचालक यांच्याकडून मनमानी पध्दतीने पैशाची आकारणी करत आहेत. अवाजवी भाडे नाकारणाऱ्या पर्यटकांना त्रास दिला जात आहे. फसवणूकीच्या अशा प्रकारांमुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात येत आहे. हे प्रकार तातडीने थांबले पाहीजेत. – मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष तथा माथेरान पर्यटन बचाव समिती समन्वयक