‘माउली’च्या जयघोषाने लोणंदनगरी दुमदुमली

अखंड हरिनामाचा जप आणि ‘माउली माउली’चा जयघोषाने आज लोणंद नगरी दुमदुमून गेली. आजच्या मुक्कामाचा आणि विसाव्याचा दुसरा दिवस भजन-कीर्तन आणि टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिरसात न्हाऊन निघाला.

अखंड हरिनामाचा जप आणि ‘माउली माउली’चा जयघोषाने आज लोणंद नगरी दुमदुमून गेली. आजच्या मुक्कामाचा आणि विसाव्याचा दुसरा दिवस भजन-कीर्तन आणि टाळमृदुंगाच्या गजरात भक्तिरसात न्हाऊन निघाला. माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी दिवसरात्र भाविकांची तुडुंब गर्दी झाली.
आज लोणंदचे रस्ते आणि पालखी विसाव्याचा परिसर भाविक आणि वारकऱ्यांच्या गर्दीने भरून वाहात असल्याचे दिसत होते. भाविकांना आणि वारकऱ्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी लोणंद ग्रामपंचायत, सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन कायम प्रयत्नशील होते. पालखी सोहळय़ाच्या व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वाईचे प्रांत अधिकारी रवींद्र खेबूडकर, खंडाळय़ाचे तहसीलदार शिवाजी तळपे, फलटणचे तहसीलदार विवेक जाधव, अनेक वरिष्ठ पोलीस व आरोग्य अधिकारी तळ ठोकून होते. गुरुवारी पालखी सोहळा लोणंद येथे विसावल्यावर झालेल्या समाज आरतीनंतर माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी सुरू झालेली भाविकांची रांग दिवसरात्र सुरू असल्याचे दिसून आले. आज सकाळच्या आरतीपूर्वी काही वेळ दर्शन थांबवण्यात आले होते. आरतीनंतर पुन्हा दर्शनरांग सुरू करण्यात आली. पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र दर्शनरांगेतून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी तळाशेजारी मालक, पालखी संस्थान, चोपदार, शितोळे सरकार आदी िदडीप्रमुखांनी राहूटय़ा उभ्या केल्या आहेत. वारकऱ्यांना दर्शनरांगेबाबत आणि इतर बाबींसंदर्भात ध्वनिक्षेपकावरून मार्गदर्शन केले जात होते. पादुकांचे दर्शन घेऊन आलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर प्रत्यक्षात माउलींना भेटल्याचे समाधान दिसत होते. दर्शनासाठी किमान दीड दोन किमीची रांग लागली होती. भाविकांना झटपट दर्शन मिळावे असाच प्रयत्न होताना दिसत होता. मात्र भाविकांच्या अखंड गर्दीमुळे दर्शनरांग कायम भरलेलीच दिसत होती. सर्वत्र हरिनामाचा गजर आणि टाळमृदुंगाचा गजर सुरूच होता.
‘साधु संत येती घरा
तोचि दिवाळी दसरा’
या उक्तीप्रमाणे अनेक ठिकाणी वारकरी व भाविकांच्या जेवणासाठी लांबच लांब पंगती बसल्याचे दिसत होते. घराघरांतून माउलींना वाजतगाजत नवद्य नेण्यात येत होते. आपल्या गावी माउलींचे आणि संतांचे वास्तव्य असल्याने आजचा दिवस लोणंदसाठी जणू दसरा-दिवाळी सणासारखा सात्त्विक आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. पंढरीच्या वाटेवर नुसते ज्ञानोबा-तुकाराम म्हटले तरी कोणीही उपाशी राहात नाही असे म्हटले जाते त्याचे आज माउलींच्या गावी लोणंद मुक्कामी दिसून येत होते.
आज पालखी सोहळय़ावर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरूच होती. एकूणच माउलींच्या आगमनाने लोणंदनगरीलाच पंढरीचे रूप आले होते. सर्व रस्ते, गल्लीबोळ वारकरी आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. दोन-अडीच दिवसांचा आपला लोणंद येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा दुपारी एक-दीडच्या दरम्यान तरडगावकडे मार्गस्थ होईल. दुपारी अडीच ते साडेतीनच्या दरम्यान तरडगाव (ता फलटण) येथे चांदोबाचे रिंगण होईल आणि पालखी सोहळा तरडगावी मुक्काम करेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mauli palkhi entered in lonand city with enthusiasm

ताज्या बातम्या