उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, अत्यंत विश्वासू आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नार्वेकरांनी ठाकरेंची साथ सोडावी याकरता भाजपाकडून रणनीती आखली जात आहे. ठाकरे गट पूर्णपणे पोखरून काढण्यासाठी नार्वेकर हे अत्यंत जालीम उपाय असल्याचं म्हटलं जातं.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहाय्यक आहेत. उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात मिलिंद नार्वेकर यांनी प्रचंड साथ दिली आहे. तसंच, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबातील इंत्थभूत माहिती नार्वेकरांकडे असते. त्यामुळे, नार्वेकरांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यास उद्धव ठाकरेंसाठी तो सर्वांत मोठा धक्का असू शकेल. त्यामुळे नार्वेकरांना आपल्या बाजूने घेण्याकरता भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत, असं फ्री प्रेसच्या वृत्त म्हटलं आहे.

हेही वाचा >> मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभा लढविणार? शिंदे गटाच्या ऑफरच्या चर्चेवर उद्धव ठाकरे म्हणाले…

मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा किंवा शिंदेंच्या शिवसेनेत येण्याचा पर्याय दिला जात आहे. ते वैयक्तिकरित्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. तसंच, चतुर राजकीय बुद्धीने फडणवीसांनी नार्वेकरांशी जवळीक साधण्याचाही अनेकदा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे येथील नार्वेकरांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या भेटीचीही मोठी चर्चा झाली होती. मिलिंद नार्वेकर शिंदे सेनेत दाखल झाले तर त्यांना एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली काम करावे लागेल. त्यामुळे एकवेळ अशी होती उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता एकनाथ शिंदेंना मिलिंद नार्वेकरांकडे विनवणी करावी लागत असे अन् आता नार्वेकरांनाच शिंदेंच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याचे चित्र आहे.

…तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मिळणार उमेदवारी?

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे. तसंच, मिलिंद नार्वेकर महायुतीत आल्यास त्यांचंही नाव या शर्यतीत घेतलं जातंय. जिथे त्यांचा थेट सामना कामगार संघटनेचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय?

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या पक्षबदलाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. मिलिंद नार्वेकरांच्या शिंदे गट प्रवेशाचे वृत्त त्यांनी या माध्यमातून फेटाळले. तसंच, माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधूनही त्यांनी नार्वेकरांच्या आम्ही संपर्कात नसल्याचे सुतोवाच त्यांनी दिले. तसंच, काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नालाच बगल देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडतात का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल.