अजित पवार गटातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याला विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी त्यांची भूमिका आहे. याच कारणामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे तसेच छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, गुरुवारी (२२ फेब्रुवारी) छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा ताफा अडवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ते मालेगाव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांना आपला दौरा आवरता घ्यावा लागला. यावरच आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आता स्वतंत्र आरक्षण देण्यात आले आहे. मग ताफा अडवण्याचे कारण काय? भुजबळ कुटुंबाने शिवसेनेत काम केलेले आहे. आम्ही कोणालाही घाबरणारे नाही, असे यावेळी भुजबळ म्हणाले. ते आज (२३ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलले होते.

“स्वतंत्र मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा”

“पंकज भुजबळ यांची गाडी का अडवण्यात आली, हे आंदोलकांनाच माहिती. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनच भूमिका होती. ती भूमिका सरकारने पार पाडली आहे. माझ्यासहित सर्वांनी या वेगळ्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा हा तिसरा प्रयत्न होता. याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तेव्हादेखील मी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे,” असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Girish Mahajan criticizes Unmesh Patil in jalgaon
“एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

“लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना अडवणे लोकशाहीच्या विरुद्ध”

“मला असं वाटतं की तरीदेखील आंदोलन करण्याचं काही कारण नाही. शांतता बिघडवण्याचं काही कारण नाही. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. वेगवेगळे पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी मतदारांना भेटणार आहेत. गावागावात जाणार आहेत. अशा रितीने लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांना अडवले जात असेल तर ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा, ओबीसी, भटक्या समजातील कार्यकर्त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं पाहिजे. आता अडचण काय आहे,” असा सवाल भुजबळ यांनी केला.

“सरकारने आपली भूमिका पार पाडली”

“आम्ही मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला विरोध केला असता तर समजू शकलो असतो. आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. यात लोकसंख्या फार मोठी आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणेच सरकारने आपली भूमिका पार पाडली आहे. त्यासंदर्भात कायदा मंजूर केला आहे,” असेही भुजबळ यांनी सांगितले.

“भुजबळ कुटुंब कोणालाही घाबरलेले नाही”

“पंकज भुजबळ यांना अडवणारे लोक कोण होते, काय होते याचा पोलिसांनी विचार करावा. ते लोक खरंच मराठा समाजासाठी आलेले होते की त्यामागे काही स्थानिक राजकारण होते, याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे. पंकज भुजबळ यांची गाडी अडवल्याचा व्हिडीओ मी पाहिला. या व्हिडीओमध्ये एक वीर व्यक्ती आम्ही भुजबळांच्या कुटुंबीयांचे हातपाय तोडून टाकू असे म्हणत आहे. हे सर्व असूनदेखील कोणी कारवाई करणार नसतील तर गृहमंत्रालय काय करत आहे ते पाहावं लागेल. काँग्रेसचा नेता म्हणून काम करत असताना, विरोधी पक्षनेता असताना माझ्या घरावर हल्ले झाले,” असे म्हणत भुजबळ कुटुंब शिवसेनेत काम करत होते. हे कुटुंब कधीही कोणाला घाबरलेले नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.