बारामती जिंकण्याच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा आमनेसामने आले आहेत. जेव्हा बारामतीची निवडणूक लागेल तेव्हा निश्चित तिथले नेतृत्त्व मी घेईन आणि बारामती नगरपालिका ताब्यात घेईन असे म्हणत गिरीश महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे.

गिरीश महाजन यांनी मध्यंतरी बारामती जिंकण्याची भाषा केली. ज्यावर अजित पवारांनी शुक्रवारी टीका केली. बारामती काय आहे ते ठाऊक नाही आणि निघाले बारामती जिंकायला. एकदा बारामतीत या मग बघतोच असे आव्हान अजित पवार यांनी दिले होते. त्याच टीकेला आज गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपण बारामती जिंकून दाखवूच असे म्हटले आहे.

अजित पवार यांनी हे आव्हान दिल्यावर गिरीश महाजन म्हटले की, पक्षाने मला आदेश दिला तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन. १०० टक्के असे त्यांच्याकडे काहीही नाही. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही असे म्हणत महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले.

दरम्यान जामनेर येथील सभेत धनंजय मुंडे यांनीही गिरीश महाजन यांच्या बारामतीवरच्या वक्तव्यावरून टीका केली. महाजन यांनी आधी स्वतःचा जिल्हा सुधरवून दाखवावा मग बारामती जिंकण्याच्या गप्पा माराव्यात असे मुंडे यांनी म्हटले होते. तर याच ठिकाणी जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा? असा प्रश्न विचारत एकनाथ खडसेंना सत्तेतून बाजूला केल्याच्या मुद्द्यावर त्यांनी खोचक टोला लगावला. आता या सगळ्याला भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच गिरीश महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे त्यावर अजित पवार काय म्हणतात याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.