Maharashtra Assembly Session Update: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळते. पण आरोप-प्रत्यारोपांमुळे जसं वातावरण तापतं, तसंच सदस्यांमध्ये होणाऱ्या मिश्किल टिप्पण्यांमुळे ते हलकं-फुलकंही होतं. असाच काहीसा प्रकार आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत घडला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अशाच मिश्किल स्वभावासाठी परिचित आहेत. त्यांनी सभागृहात प्रश्न विचारणाऱ्या आमदारालाच दोनदा ‘मंत्री महोदय’ म्हटल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला!
नेमकं काय घडलं?
विधानसभेत अक्कलकुव्याचे शिवसेना आमदार अमश्या फुलजी पाडवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नरहरी झिरवळ यांनी अमश्या पाडवी यांचाच मंत्रीमहोदय म्हणून उल्लेख केला. अमश्या पाडवी यांनी अक्कलकुव्यातील तेल भेसळीच्या मुद्द्यावर संबंधित खात्याचे मंत्री म्हणून नरहरी झिरवळ यांच्यासाठी प्रश्न उपस्थित केला.
“अक्कलकुवा तालुक्यात सध्या फॅक्टरीत टँकर लावून तेल भेसळ केली जात आहे. नंदुरबार जिल्हा पूर्णपणे आदिवासी जिल्हा आहे. मी ज्या मतदारसंघात राहतो, तो १०० टक्के आदिवासी आहे. तिथे हे भेसळयुक्त तेल दिलं जात आहे. या भागात काही लोकांना कर्करोग झालाय, काहींना इतर गंभीर आजार आहेत. मी मागेही तक्रार केली असताना २५ लाखांचा माल जप्त केला होता. पण काही दिवसांत ते तेल चांगलं आहे असं सांगून परत केलं होतं. हा तेल भेसळ करणारा व्यक्ती आमच्या आदिवासी बांधवांना या तेलामुळे आजारी पाडत आहे. त्याच्यावर कारवाई होईल का?” असा प्रश्न पाडवी यांनी नरहरी झिरवळ यांना विचारला.
स्वत: मंत्री, पण पाडवींनाच म्हणाले ‘मंत्रीमहोदय’
दरम्यान, पाडवींच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता नरहरी झिरवळ यांनी अमश्या पाडवींचा उल्लेख ‘मंत्रीमहोदय’ असा केला. बरं पहिल्यांदा इतर आमदारांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतरही दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा तसाच उल्लेख केल्यानंतर सभागृहात पुन्हा हास्याची लकेर उमटली. नरहरी झिरवळ यांनी त्यावर टोमणे मारणाऱ्या आमदारांना ‘सॉरी बोललोय’ असं म्हणत प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली.
आधी झिरवळ यांनी “मंत्रीमहोदयांनी विचारलेला प्रश्न खरा आहे”, असं म्हणताच आमदारांनी त्यांना चूक लक्षात आणून दिली. त्यावर झिरवळांनी ‘सॉरी’ म्हणत चूक समजल्याचं सांगितलं. मग पुन्हा “अध्यक्ष महोदय, मंत्रीमहोदयांनी विचारलेला प्रश्न..”, असं म्हणताच पुन्हा एकदा सदस्यांनी गलका केला.
नार्वेकर म्हणतात, “भूमिकेत शिरायला वेळ द्या”
दरम्यान, या गलक्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पडत नरहरी झिरवळ यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. “त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही”, असं नार्वेकरांनी म्हणताच गलका करणाऱ्या आमदारांनी त्यांना हसून दाद दिली.
अमश्या पाडवींच्या प्रश्नावर उत्तर
हा प्रसंग ओसरताच नरहरी झिरवळ यांनी अमश्या पाडवी यांच्या प्रश्नावर सविस्तर उत्तर दिलं. “आमदार महोदयांनी विचारलेला प्रश्न गंभीर आहे. तेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ चालू आहे. त्यांच्या मतदारसंघात मे. गोपाल प्रोव्हिजन अशा नावानं अक्कलकुव्याला ही कंपनी असून तेलाचं उत्पादन करते. या कंपनीच्या अनेकदा चौकशा झाल्या आहेत. प्रत्येकवेळी त्यात काही ना काही भेसळ निघाली आहे. कंपनीतून घेतलेले नमुने कमी दर्जाचे असल्याचं निदर्शनास आलं आहे. या कंपनीच्या मालकाविरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आपल्याकडेही गुन्हा दाखल झाला आहे. ते नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्याचे अहवाल आल्यानंतर तात्काळ ती कंपनी बंद केली जाईल”, असं आश्वासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलं.