राहाता: दीर्घकालीन, अल्पकालीन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी निर्णय घेण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना दिली.
मंत्री संजय राठोड यांनी सहकुटुंब साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर राठोड म्हणाले, मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. कुठे पाऊस आहे, कुठे नाही. सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वात आमचे सरकार सामान्य लोकांसाठी काम करीत आहे. लोकांसाठी आम्ही अनेक योजना घेतलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या घरात सुखसमृद्धी, आरोग्य, भरभराट नांदावी. सर्वत्र आनंदाचे वातावरण राहो, अशी प्रार्थना साईबाबा चरणी केली आहे.
‘विकेट’ पडण्यावर सावध भूमिका
शेतकरी कर्जमाफीसाठी आम्ही बोललेलो आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही सरकारमध्ये अनेक धाडसी निर्णय घेतले. आताचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करताना सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. राज्यातील ८ मंत्र्यांच्या ‘विकेट’ पडणार व त्यात संजय राठोड यांची विकेट जाणार या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सावध भूमिका घेत, ते म्हणाले, संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते काय बोलतात, किती खरे झाले, हे आपणच तपासून पहा, असे म्हणत मंत्री राठोड यांनी राऊतांच्या वक्तव्यावर चार हात दूर राहणेच पसंत केले. आगामी महापालिका निवडणुका आम्ही महायुती म्हणून एकत्र लढू असे यापूर्वी तिन्ही नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीसारखाच जनतेचा भरभरून आशीर्वाद आम्हाला पुन्हा महायुती म्हणून मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.