साधुग्राममधील कामांच्या दर्जावरून पालकमंत्र्यांनी ठेकेदाराची देयके रोखून धरण्याचे सूचित केले होते. दुसरीकडे मुख्यमंत्री सिंहस्थाची कामे चांगली असल्याचे प्रमाणपत्र देतात. उभयतांच्या विधानांचा विचार केल्यास कोणी तरी चुकीचे सांगत आहेत, असे नमूद करत महंत ग्यानदास महाराजांनी शासनाच्या परस्परविरोधी भूमिकेवर बोट ठेवले. कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, सातत्याने चाललेल्या मंत्री महोदयांच्या दौऱ्यांचा कामांवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे संबंधितांनी कामे पूर्ण होण्यासाठी आपल्या दौऱ्यांवर आवर घालावा, असे आवाहन त्यांनी केले.
साधुग्रामच्या व्यवस्थेवरून महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या ग्यानदास महाराजांनी सिंहस्थ कामांच्या दर्जाबाबत मंत्र्यांच्या विधानांचा संदर्भ दिला. कुंभमेळ्यासाठी तब्बल २५०० कोटींची कामे करण्यात आली आहेत. या कामांच्या दर्जावर आधीच अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या साधुग्राममध्ये तीन लाख साधू-महंत वास्तव्य करणार आहेत, तेथील निवारागृहांचे पत्रे पहिल्याच पावसात उडून गेले होते. तात्पुरती निवारागृहे उभारताना लाकडी खांबांवर दोरीने पत्रे बांधले गेले. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यावर या कामांचा दर्जा चांगला नसल्याचे सांगत ठेकेदाराची देयके रोखण्याचा इशारा दिला होता. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आढावा बैठक पार पडली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी सिंहस्थाची कामे उत्तम प्रकारे झाल्याचा निर्वाळा दिला. दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यावर टिपण्णी करताना महंतांनी कोणी तरी एक चुकीचे सांगत असल्याचे स्पष्ट केले.
सिंहस्थ नियोजनात एकूण २२ शासकीय विभाग गुंतले आहेत. या खात्यांचे मंत्री आढावा घेण्यासाठी वारंवार नाशिकला येत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आजवर तीन वेळा नाशिक येथे आढावा घेतला. सिंहस्थाला सुरुवात होण्यास केवळ दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी अडकून पडतात. सिंहस्थाची कामे होत नाहीत. यामुळे मंत्र्यांनी दौऱ्यावर आवर घालणे आवश्यक असल्याचे महाराजांनी नमूद केले.