नांदगाव : विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नांदगाव मतदारसंघाचे आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधात मागील आठवडय़ात राष्ट्रवादीतील एका गटाने बैठक घेऊन येत्या निवडणुकीत पंकज भुजबळांना उमेदवारी नकोच, अशी मागणी केल्यावर आता त्यांच्या समर्थनार्थही बैठक घेण्यात आली.

मतदारसंघाचा विकास करण्याची क्षमता फक्त भुजबळांमध्ये असल्याने सर्वानी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी भुजबळ समर्थकांच्या मेळाव्यात केले. मागील आठवडय़ात ‘भुजबळ नकोच’ अशी बैठक राष्ट्रवादीतील काही नाराज पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात पाटील यांनी आमदार पंकज भुजबळ यांनी १० वर्षांत मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्याच्या दृष्टीने कामे केल्याचे सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने मांजरपाडय़ाचे पाणी येवल्यात आले आहे. या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून मांजरपाडय़ाचे पाणी नांदगावात आणण्यासाठी प्रयत्ने केले जाणार आहेत. हे काम भुजबळच करू शकतील. त्यामुळे क्षणिक मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

सावकारवाडीचे सरपंच आबा साळुंके यांनी सोनज जिल्हा परिषद गटात झालेली कामे सांगितली. पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर भुजबळांना येथून जाऊ  देऊ  नका, असे सांगितले. मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. यशवंत जाधव, बाळकाका कलंत्री, जातेगावचे सरपंच नारायण पवार, साकोऱ्याचे माजी सरपंच देवदत्त सोनवणे, भाऊसाहेब सूर्यवंशी, मनमाडचे रईस फारुखी, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष तेजस्विनी इप्पर आदींनी मनोगत व्यक्त केले.