सोलापूर : उजनीसारख्या मोठ्या धरणातील प्रचंड पाणीसाठा यंदाच्या उन्हाळ्यात शेती आणि पिण्यासाठी वापरण्यात आला, तरी अजूनही सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके पाण्यावाचून तहानलेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी उजनीच्या पाण्यासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन करूनही त्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणासमोर (सिंचन भवन) धरणे आंदोलन केले.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सीना नदीपाठच्या शेतकऱ्यांनी शेतीला उजनी धरणातून पाणी मिळण्यासाठी गेल्या ५ मे रोजी सिंचन भवनासमोर धरणे आंदोलन केले होते. त्या वेळी आंदोलक शेतकऱ्यांना १२ मे रोजी उजनी लाभक्षेत्रातील कुरूल शाखा कालव्यातून महादेव ओढ्यामार्गे सीना नदीत पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्याप्रमाणे पाणी सोडण्यात आले नाही.
या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी उजनी लाभक्षेत्र प्राधिकरण सिंचन भवनासमोर सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन केले. हे आंदोलन सुमारे दीड तास चालले. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आमदार देशमुख यांच्याशी संपर्क साधला. उजनीचे पाणी कुरूल शाखा कालव्यावाटे सीना नदीच्या पात्रात तत्काळ सोडण्याचे पुन्हा आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आमदार देशमुख यांनी आंदोलन थांबवून सायंकाळी सीना नदीत पाणी सोडले जाण्याची वाट पाहिली.