नगर : तब्बल १५ आमदारांचा समावेश असलेली विधिमंडळाची विमुक्त जाती-भटक्या जमाती कल्याण समिती उद्या, गुरुवारपासून तीन दिवसांच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ही समिती जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणार आहे. तसेच आढावा घेणार आहे. या समितीच्या भेटी, बैठका व इतर नियोजनासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. समितीच्या सदस्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ न देण्याची सक्त लेखी सूचना विधिमंडळाच्या सचिवालयाकडून तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विधानसभा व विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांतील आमदारांचा त्यात समावेश आहे. शांताराम मोरे समितीचे प्रमुख आहेत. ही समिती गुरुवार, शुक्रवार व शनिवार असे तीन दिवस नगरच्या दौऱ्यावर येत आहे. विविध शासकीय विभाग, विविध महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती, आरक्षण, अनुशेष, त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजना याचा आढावा समितीमार्फत घेतला जाणार आहे. समिती कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी पाहण्यासाठी विविध ठिकाणी भेटीही देणार आहे. जात पडताळणी अधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक होणार आहे. १५ आमदारांशिवाय समितीसमवेत २३ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमाही असेल. या सर्वाच्या निवास, वाहन, भोजन व्यवस्थेसाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली आहे. समितीचे सदस्य असलेल्या १५ आमदारांसाठी प्रत्येकी एक संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या सदस्यांना समितीचे कामकाज करताना तसेच पाहणीसाठी भेटी देताना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता बाळगण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

Balasaheb Thorat
अशोक चव्हाणांच्या जाण्याने नांदेडमध्ये काँग्रेसला फटका बसणार? बाळासाहेब थोरात म्हणाले, “जर ते…”
Hindutva organization, BJP, Solapur,
सोलापुरात भाजपच्या पाठीशी हिंदुत्ववादी संघटना
Praniti Shinde, Solapur,
सोलापूरचे भाजपचे दोन्ही खासदार सतत दहा वर्षे नापासच, प्रणिती शिंदे यांची टीका
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

या समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विधिमंडळ सचिवालयाने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना प्रश्नावली पाठवली आहे. या प्रश्नावलीची माहिती सचिवालयाला ३५ प्रतीमध्ये तर समितीला २५ प्रतीमध्ये सादर करण्याच्या सूचना आहेत.

समितीचे १५ आमदार सदस्य

विधिमंडळाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीमध्ये आमदार सर्वश्री शांताराम मोरे, नितीनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक, रोहित पवार, बळवंत वानखेडे, राजू आवळे, सुरेश भोळे, विनोद अग्रवाल, रत्नाकर गुट्टे, राजेंद्र राऊत, क्षितिज ठाकूर, संजय दौंड, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर व बाळाराम पाटील.