आज पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष बारसूला येऊन गेले. इकडे येऊन काय म्हणाले? जी लोकांची भावना आहे ती आमची भावना आहे. मग मुंबईचा महापौर बंगला हा काय लोकांना विचारुन ढापलात का? असा थेट प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये सभा झाली. त्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हा थेट सवाल केला आहे. इतकंच नाही तर कोकणच्या सगळ्या बांधवांना सावध रहा अशीही विनंती केली आहे.

माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सगळ्या कोकणवासियांना माझी ही विनंती आहे की हात जमीन घ्यायला कुणी आला तर त्याला विचारा की तुला कशाला ही जमीन हवी आहे? हीच जमीन तुम्हाला उद्या पैसे देईल. आत्तापर्यंत जे व्यापारी लोकप्रतिनिधी निवडून देत आलात ना? त्यांना जरा घरी बसवा. त्यांना सांगा.. आम्हाला आजपर्यंत विकलंत त्यांना त्यांची जागा दाखवा.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगत आहेत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे वा! मग तुम्हाला हवा होता म्हणून मुंबईत बाळासाहेबांच्या नावावर महापौर बंगला ढापलात तो लोकांना विचारुन ढापलात? आता तुमच्यासमोर येत आहेत तुमची भावना सांगत आहेत. त्याला काय अर्थ आहे? लोक जेव्हा तुम्हाला निवडून देतात त्यावेळी तुम्ही लोकांचं हित पाहिलंच पाहिजे.

जनतेचं हित कशात आहे? त्यांना घरदार सोडावं लागणार नाही ही काळजी सरकारने घ्यायची असते. आता हे काय सांगत आहेत तुमची भावना ती आमची भावना? बाबांनो हे सगळे फसवत आहेत. तुम्हाला मूर्ख बनवत आले आहेत हे सगळे आजपर्यंत. थोडा विचार करा या सगळ्या गोष्टींचा. हे सगळे कधी या प्रदेशाची धूळधाण करतील तुम्हाला कळणारही नाही. सगळ्यांचे काही ना काही तरी हेतू आहेत. व्यापारविषयक हेतू आहेत. या सगळ्या गोष्टींमधून आपलं कोकण वाचवा म्हणूनच मी रत्नागिरीत आलो. मी सांगितलेल्या गोष्टींबद्दल गांभीर्याने विचार करा असंही आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.